इचरजबाई फिरोदिया प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे स्नेहालयातील वंचित मुलांसाठी अनोखे ‘दीपदान'.
अहमदनगर दि. १८ ऑक्टोंबर - दिवाळी हा सण प्रकाशपर्व म्हणून देशभरात उत्साहात साजरा केला जातो. पालकांच्या प्रेमाला पोरके झालेल्या अनाथांना आपुलकीचा आणि प्रेमाचा स्पर्श देण्यासाठी या दिवाळीच्या निमित्ताने एक अनोखा उपक्रम आयोजित केला आहे. येथील स्नेहालय संस्थेच्या वतीने ‘दीपदान-जीवन उजाळून वंचितांचे, औचित्य दीपोत्सवाचे’ या उपक्रमाअंतर्गत बालगृहे व अनाथगृहांत राहणाऱ्या अनाथ तसेच झोपडपट्टी मधील गरीब वंचित मुलांसाठी दिवाळीनिमित्त मिठाई, खाऊ, खेळणी, नवीन कपडे, शालेय साहित्य आदी साहित्य दान करण्यासाठीचे आवाहन करण्यात येत आहे.यासाठी विविध शाळा, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय , हॉस्पिटल, सरकारी कार्यालय , सामाजिक भावना जपणारे मदतकर्ते यांनी पुढाकार घेतला आहे.
अहमदनगर बाजारपेठेतील नवी पेठ येथील अ. ए.सो.ची, बाई इचरजबाई फिरोदिया प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.विजय रामचंद्र कदम आणि त्यांच्या शिक्षकांच्या पुढाकारातून प्रशालेने आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. या मधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दातृत्वाचे संस्कार रुजविण्यासाठी त्यांना आपणही आपल्या घासांमधील एक घास वंचित मुलांना देऊ शकतो ही भावना रुजविण्याचा प्रयत्न केला.येथील बालक व पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि शाळेतील ११९९ विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मदत गोळा करून स्नेहालय मधील मुलांकरिता मदत मिळून दिली.
यात साबण, उटणे, पेस्ट, टुथब्रश, पावडर, क्रिम, टॉवेल, फराळाचे साहित्य आणि शालेय साहित्य, वह्या व पुस्तकांचा समावेश होता. ही मदत आज दिनांक १८ ऑक्टोबर रोजी स्नेहालय संस्थाचे कार्यकर्त्यांना निमंत्रित करून शाळेतील शिक्षक, पालक, आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.यावेळेस हनीफ शेख यांनी बाई इजरजबाई फिरोदिया शाळेच्या पालक-शिक्षक-विद्यार्थी यांना मनःपूर्वक धन्यवाद देत, उपक्रमातून प्रेरणा घेत इतर शाळांनी ही दीपदान चळवळ यशस्वी करण्याचे आवाहन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कदम सर , सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालकांचे आभार व्यक्त करून विद्यार्थ्यांना स्नेहालयाच्या वतीने कृतज्ञता प्रमाणपत्राचे वाटप केले.