पीक विमा कंपन्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील.

Ahmednagar Breaking News
2 minute read
0

 पीक विमा कंपन्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ - महसूलमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील.


अहमदनगर,  प्रतिनिधी :(२३,ऑक्टोबर ) - पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या कंपन्यांच्या बाबतीत कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. महसूल, कृषी आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधीची एकत्रित बैठक पुढील आठवड्यात घेणार असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

 


श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवडगाव व टाकळीभान गावातील पीक पाहणी.

             श्रीरामपूर तालूक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नूकसानीची पाहणी महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी बांधावर जावून केली. यावेळी शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. याबाबत उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांचेकडूनही त्यांनी वस्तूस्थिती जाणून घेतली. टाकळीभान येथे शासनाने दिवाळीच्या निमित्ताने केशरी कार्ड धारकांना दिलेल्या 'आनंदाच्या शिधा' कीटचे वितरण महसूलमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

               पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की,  नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. एकीकडे दिवाळी असताना बळीराजा संकटात आहे. या परिस्थिती त्याच्या बांधावर जावून दिलासा देण्याचे काम सरकारच्या वतीने आम्ही करीत आहोत. अतिवृष्टीमुळे हाताशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 

                 विमा कंपन्याच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चीड असून विमा घेतल्यानंतर नूकसान भरपाई मिळण्यात झालेला गोंधळ समोर आला असून यासंदर्भात सर्व तालुक्यातील विमा कंपनीच्या विरोधातील तक्रारी एकत्रित करून याबाबत निर्णय करण्यासाठी कृषी मंत्री अब्दुल सतार यांच्या उपस्थितीत महसूल व कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सर्व विमा कंपन्याच्या  प्रतिनिधिची बैठक घेणार असल्याचे ही महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले.

             महसूलमंत्र्यांनी मंत्री श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवडगाव येथे पीकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. स्थानिक तालुका कृषी अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांच्याकडून सुरू असलेल्या पंचनाम्याची सखोल माहिती जाणून घेतली. पंचनामे करण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. अशा सूचना‌ही त्यांनी संबंधितांना दिल्या.

             टाकळीभान येथे आनंदाच्या शिधा कीट चे वितरण महसूलमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुठेवडगाव जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन ही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

              याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक राकेश ओला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, प्रांतधिकारी अनिल पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.नलगे, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका कृषी श्री.साळी, जलजीवनचे उपअभियंता श्री.गडदे, स्थानिक पदाधिकारी दिपक पठारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, भाऊसाहेब कांबळे, सिद्धार्थ मुरकुटे, गिरीधर आसने, बाबासाहेब चिडे, नानासाहेब पवार, अविनाश लोखंडे, नानासाहेब शिंदे ननावरे , शंकर मुठे, प्रकाश चिते यांच्या सह स्थानिक पदाधिकारी ,शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top