जिवाजी महाले स्मारक व शिवसृष्टी किल्ले प्रतापगड येथील स्मारकाची संवर्धनासाठी प्रयत्न करणार - खा.डॉ.सुजय विखे.
नगर, प्रतिनिधी- शिवरत्न जिवाजी महाले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक होते. प्रतापगडावरील लढाई प्रसंगी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता महाराजांचे प्राण वाचविले, हा इतिहास सर्वांना माहिती आहे. ‘होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी’ या म्हणीची इतिहासात नोंद झाली. अशा या शूरवीर जीवाजी महाले स्मारक व शिवसृष्टी किल्ले प्रतापगड येथील स्मारकासाठी जागा निश्चित संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खा.डॉ.सुजय विखे यांनी केले.
सावेडी उपनगरात प्रभाग क्र.2 मध्ये जीवा सेना संघटनेच्यावतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी खा.विखे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष योगेश पिंपळे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार,माऊली गायकवाड, अशोक औटी, श्री.सोलाट साहेब, नागरिक उपस्थित होते.
खा.विखे पुढे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांनी जीवाजी महाले स्मारकासाठी प्रयत्न केले होते. त्यांचे व समस्त नाभिक बांधवांचे स्मारकाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष योगेश पिंपळे यांनी जीवाजी महाले यांच्या पराक्रमाची उदाहरणे देऊन ते म्हणाले, नगर-मनमाड रोडवरील जीवाजी महाले चौक नामकरण करत त्यांच्या कार्याची आठवण जोपसत आहोत. त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक व मान्यवरांनी जीवाजी महाले यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी बाळासाहेब भुजबळ, रमेश बिडवे, वनिता बिडवे, आशिष ताकपिरे, कांचन बिडवे, स्वाती पवळे, संदिप सोनवणे आदि उपस्थित होते.