अतिवृष्टीमुळे बाधित भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.-पालकमंत्री- राधाकृष्ण विखे- पाटील.
अहमदनगर, प्रतिनिधी:( 23,ऑक्टोबर) जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे, काही भागात शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. असे प्रतिपादन राज्याचे, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पालकमंत्री, श्री विखे पाटील यांनी आज राहाता, श्रीरामपूर,नेवासा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांची पाहणी केली. त्यानंतर नेवासा तालुक्यातील वरखेड येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या पाहणी दौरात , जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी, सोनाप्पा यमगर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वीरेंद्र बडदे, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, संबंधित तालुक्याचे प्रांत अधिकारी तहसीलदार,तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले,अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी, दिवाळी असताना सुद्धा आम्ही त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहोत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी त्यांना मिळेल. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनस्तरावर लवकरच निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदतीची रक्कम जमा करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले.विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मिळणारी मदती संदर्भात काही तक्रारी आल्या आहेत,याबाबत लवकरच शासन स्तरावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. असे ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले.
राज्यातील गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने, राज्यशासनाने आनंदाचा शिधा किट सरकार मान्य धान्य दुकानावर उपलब्ध करून दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व गोरगरिबांना शंभर टक्के शिधा वाटप होणार आहे. यासंदर्भात प्रशासनाने नियोजन केले आहे. नेवासा तालुक्यातील मंगळापुर येथील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन नुकसानाची पाहणी करताना त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी पालकमंत्री यांनी शेतातूनच विमा कंपनीचे अधिकारी यांच्याशी संपर्क करून तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यासंदर्भात चर्चा केली.पुढे त्यांनी वरखेड येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसान झालेल्या शेती पिकांची माहीती घेतली.
शिरसगाव येथे जगदंबा माता मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून त्यांच्याशी संवाद साधला, शिरसगाव परिसरात नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी या परिसरातील सर्व पदाधिकारी,महसूल,कृषी,पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.