शहरातील कापड बाजारातील "मोचीगल्ली"चे नाव बदलून "श्री बाबा रामदेवजी मार्ग "असे करावे.- विविध संघटनांची निवेदनाद्वारे मागणी.
अहमदनगर,प्रतिनिधी. (02. नोव्हेंबर.) : सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने जातीवाचक रस्त्यांची नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार नगर शहरातील मोचीगल्ली, कापडबाजारचे नाव बदलून 'श्री बाबा रामदेवजी मार्ग' करण्यात यावे, अशी मागणी शहरातील विविध सामाजिक, धार्मिक, व्यापारी व स्वयंसेवी संघटनांनी केली आहे.
यासंदर्भात या विविध संघटनांनी महापालिका आयुक्तांना निवेदने सादर केली आहेत. त्यात अहमदनगर हिंदू-मोची समाजसेवा संघ, महाराष्ट्र राज्य हिंदू-मोची समाज बहुउद्देशीय संस्था (जळगाव), श्री रामदेव भक्त मंडल ट्रस्ट, जैन ओसवाल युवक संघ, अहमदनगर रिटेल फूटवेअर असोसिएशन, खिस्तगल्ली संगम तरुण मंडळ, राजस्थानी युवा संघटना, जय आनंद फौंडेशन,महात्मा गांधी रोड व्यापारी असोशिएशन, वंदे मातरम युवा प्रतिष्ठान, अहमदनगर व्यापारी महासंघ, सकल राजस्थानी युवा मंच, महिला मंच, अहमदनगर कापड व्यापारी संघ आणि कापड बाजार श्री गणेश मित्रमंडळ आदी संघटनांचा त्यात समावेश आहे.
या संघनांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रामदेवजी हे राजस्थानमधील लोकदेवता असून, ज्यांची पूजा गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब व अन्य राज्यातील सर्व जार्ती-धर्मातील लोक करतात. बाबांची समाधी रामदेवरा (जैसलमेर) येथे असून, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीयपासून दशमीपर्यंत भव्य मेळा भरतो, ज्यासाठी जगभरातील भक्त जमा होतात.बाबा रामदेवजी हे १४ व्या शताब्दीतील एक शासक होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन दलित व गरिबांच्या उत्थानासाठी समर्पित केले. भारतातील खूप साऱ्या समाजातील लोक त्यांना 'इष्टदेवता, कुलदेवता' म्हणून पुजतात.
"श्री बाबा रामदेवजी" अशा महान देवतेला जी सर्व धर्मियांकडून पुजले जाते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब व दलितांच्या उत्थानासाठी समर्पित केले, ज्यांचे आशीर्वाद देशातील प्रमुख नेते व महाराष्ट्रातील प्रमुख नेते घेतात अशा "श्री बाबा रामदेवजी'चे नाव सदर बाजारपेठेस देऊन शासन निर्णयातील उद्देशानुसार सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण करून राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल.
मोची गल्ली, कापडबाजेरचे नाव बदलून "श्री बाबा रामदेवजी" देण्यात यावे व कापडबाजारामधील देडगावकर सराफ यांच्या दुकानापासून ते दै. नवामराठा कार्यालय, आचार्य गुंदेचा चौकापर्यंत "श्री बाबा रामदेवजी मार्ग" करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.