सप्तशृंगी गड आणि त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठास भोग प्रमाणपत्र.
नाशिक, प्रतिनिधी.(२४. नोव्हेंबर.) : अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्यावतीने नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीगड आणि त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथील प्रसादालय यांचे भोग प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेमुळे भक्तांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळणार आहे.धार्मिक श्रध्देची ठिकाणे हा भारतीय समाजाचा महत्त्वाचा भाग आहे. याठिकाणी दिलेले अन्न शुध्द आणि पवित्र मानले जाते. भोग अर्थात परमेश्वरालाआनंददायी आरोग्यपूर्ण अर्पण हा उपक्रम धार्मिक संस्थांच्या प्रसादालयात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी राबविण्यात येणारा इट राईट इंडिया या उपक्रमाचा एक भाग आहे. प्रसाद, अन्न तयार करताना अन्न हाताळणारे आणि विक्रेते यांना अन्न सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यानंतर संबंधित संस्थांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.या उपक्रमामुळे भक्तांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नाशिक जिल्हा हा हिंदू धर्मीयांचे प्रमुख धर्मस्थळ आहे. देश-विदेशातून अनेक भाविक देवदर्शनासाठी येत असतात.ही बाब लक्षात घेऊन अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्यावतीने गणेशोत्सवानंतर दोन्ही ठिकाणी सदर उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यातआली.सप्तशृंगी निवासिनी देव ट्रस्टच्या प्रसादालयाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सुपरवायझर प्रशांत निमक तसेच श्री स्वामी समर्थ गुरु त्र्यंबकेश्वर येथील प्रसादालयाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील, मनोज मुरादे यांनी यासाठी परिश्रम घेतले.अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त गणेश परळीकर, सहायक आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, गोपाल कासार यांनी संपूर्ण प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केली.