स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल आणि करिअर मायडीया कंपनीच्या सहयोगातून म्हसणे गावात मोफत आरोग्य शिबिर संपन्न.
पारनेर,प्रतिनिधी. : पारनेर तालुक्यातील म्हसणे गावामध्ये करिअर मायडीया व स्नेहालय संचालित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात संपूर्ण शारीरिक तपासणी, महिलांच्या आरोग्य विषयक तपासण्या,बालकांमधील विविध आजारांची तपासणी, रक्तदाब इत्यादी आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच मधुमेह, रक्तगट या रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या. सर्व सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
आरोग्य निदान शिबिरामध्ये मोफत औषधे वाटप करण्यात आले. तसेच सदर शिबिरामध्ये केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे मेडीकल ऑफिसर डॉ.अर्चना लांडे यांनी आरोग्य विषयक शंकांचे निवारण करून निरोगी आरोग्य जगण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी व तज्ञ डॉक्टरांकडून घेतलेला सल्ला कसा आवश्यक आहे याचे महत्व सांगितले. शिबिरार्थीना रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधाचे मार्गदर्शन केले. निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे व स्थानिक ग्रामस्थांचे आरोग्य उंचविण्याच्या उद्देशाने म्हसणे गावाप्रमाणेच पारनेर तालुक्यातील २४ गावांमध्ये अश्याच प्रकारचे आरोग्य शिबीर स्नेहाल्याच्या सहयोगाने आयोजित करण्यात येणार असल्याचे करिअर मायडीया कंपनीचे प्लांट हेड जयदेव सिंग यांनी शिबीर उद्घाटनप्रसंगी सांगितले.
या शिबिरात ११९ रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली तसेच १११ रुग्णांची रक्तांच्या व इतर तपासण्या यशस्वीरित्या करण्यात आल्या.मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये म्हसणे गावातील सरपंच डॉ.विलास काळे यांनी आरोग्य निदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी करिअर मायडीया कंपनीतील प्लांट हेड जयदेव सिंग, डी.जी.एम.प्रोडक्शन विकास कुबनानी, एच.आर.मॅनेजर कपिल धुमाळ, मेडीकल ऑफिसर डॉ. अर्चना लांडे, डॉ. मेघना मराठे व म्हसणे ग्रामपंचायत चे सर्व सदस्य व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी केअरिंग फ्रेड्स हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे जनसंपर्क अधिकारी अजिंक्य भिंगारदिवे, हॉस्पिटलचे ओ.आर.डब्लू रीना जगदेव व अनिकेत धायटे, लॅब टेक्नेशिअन कीर्ती कटके, स्नेहालयाचे शिबीर सहाय्यक पवन तंगडे, नर्स वैशाली पंडोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.