प्रेमदान चौकातील गाळ्यांसाठी व्यावसायिकांनी केली म्हाडाच्या ऑफिसमध्ये फॉर्म घेण्यासाठी गर्दी.
अहमदनगर, प्रतिनिधी.: अहमदनगर शहरातील प्रेमदान चौकात बांधण्यात आलेल्या म्हाडाच्या व्यावसायिक ४० गाळ्यासाठी व्यावसायिकांनी म्हाडाच्या ऑफिसमध्ये गर्दी केली .नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत (म्हाडा) शहरातील प्रेमदान चौकात बांधण्यात आलेल्या ४० व्यावसायिक गाळ्यांची गुरुवारपासून (दि.१०) निविदा विक्री प्रक्रिया सुरू झाली आहे. निविदा अर्ज खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी दुपारी २ पर्यंत एकूण ७६०अर्जांची विक्री झाल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हाडाच्या सिव्हिल हडको परिसरातील कार्यालयात ही अर्ज विक्री सुरू आहे. प्रेमदान चौकात म्हाडाची भव्य इमारत बांधून पूर्ण झाली आहे.यात असलेल्या ४० व्यावसायिक गाळ्यांचा निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून लिलाव केला जाणार आहे.व्यावसायिकदृष्ट्या प्रेमादान चौक परिसर महत्त्वपूर्ण मानला जातो.त्यामुळे येथे गाळा खरेदीसाठी अनेक व्यावसायिक इच्छुक आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून निविदा खरेदीसाठी गर्दी होत आहे. ९ डिसेंबरपर्यंत दुपारी ३पर्यंत निविदा खरेदी करता येणार आहे.१२ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० पर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर याच दिवशी दुपारी २ पासून सावेडीतील माउली सभागृह येथे इन कॅमेरा व सरकारी पंचासमक्ष निविदा उघडल्या जाणार आहेत. निविदा भरणाऱ्यांना सोबत म्हाडाच्या नावाने ५० हजारा रुपयांचा धनादेश अनामत रक्कम म्हणून द्यावा लागणार आहे. लिलावात गाळा मिळाला नाही तर ही रक्कम परत केली जाणार आहे. प्रति निविदा अर्जाची रक्कम ५९० रुपये आहे.