बालदिनी अहमदनगर चाईल्ड लाईनतर्फे जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचे उद्दिष्ट राबविणार.- स्नेहालय.

Ahmednagar Breaking News
0

बालदिनी अहमदनगर चाईल्ड लाईनतर्फे जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचे उद्दिष्ट राबविणार.- स्नेहालय.




अहमदनगर,प्रतिनिधी.( १३. नोव्हेंबर.) : चाईल्ड लाईन हा केंद्रीयमहीला बालविकास मंत्रालय (भारत सरकार) व स्नेहालय संचलित बालकांसाठी चालवला जाणारा प्रकल्प असून ० ते १८ वयोगटातील काळजी व संरक्षणाची गरज असणा-या बालकांसाठी काम करतो. १०९८ हा चाईल्ड लाईनचा मोफत क्रमांक आहे.“ स्नेहालय संचलित चाईल्ड लाईन अहमदनगर, मराठी पत्रकार परिषद, अहमदनगर व बाल संरक्षण कक्ष, अहमदनगर” यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसानिमित्त “बालदिन” उत्साहात साजरा करण्याची मोहीम दर वर्षी राबविते. यावर्षीही चाईल्ड लाईन से दोस्ती सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. दि. १४ नोव्हेंबर २०२२ ते २० नोव्हेंबर २०२२ पर्यंत वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. १९ वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यात चाईल्ड लाईन उपक्रमाने १८३७ बालविवाह रोखले. ५४३ च्या आसपास बालकामगार, ९६० बालभिक्षुक, १८५६ अत्याचारग्रस्त बालके यांची सुटका करून न्याय मिळवून दिला. १७८७ मुलांना आश्रय देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणले. ७२६३ बालकांचे समुपदेशन केले आहे. ७४० मुलांना कोरोना महामारीतील एक किंवा दोन पालक गमावले यांना अन्न-धान्य-शिक्षण व निवारा मिळवून दिला. तसेच इतर १९२६ च्या आसपास  विविध प्रकारच्या केसेस हाताळल्या आहेत. मागील १९ वर्षात सुमारे १६,१७२ वंचित बालकांना उपचार-काळजी- संरक्षण आणि भविष्य देणारी अहमदनगर चाईल्ड लाईन बहुविध उपक्रमांद्वारे यंदाच्या बालदिनी “बालविवाह विरोधी अभियान” अहमदनगर जिल्ह्यातील तालुके, गाव, वस्ती तसेच शहरी भागात झोपडपट्ट्या, लालबत्ती विभाग आणि काही प्रमुख शैक्षणिक संकुलांमधुन करणार आहे, अशी माहिती अहमदनगर चाईल्ड लाईनचे समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी दिली.

          अहमदनगर जिल्ह्यात ८० टक्के बालविवाहातून बालकांची मुक्तता करण्याचे उद्दिष्ट चाईल्ड लाईनमुळे शक्य झाले असले तरी वर्ष २०२५ पर्यंत संपूर्ण अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याची मोहीम चाईल्ड लाईनने हाती घेण्याचे उद्दिष्ट आहे असे चाईल्ड लाईनचे समुपदेशक श्री. अलिम पठाण यांनी नमूद केले.

           श्री. प्रविण मुत्याल संचालक, चाईल्ड लाईन यांनी सांगितले की, बालकांची काळजी-संरक्षण-सुटका-पुनर्वसन या चौकटीबाहेर जाऊन व्यापक बालहक्क जागरण चाईल्ड लाईनने केले आहे. याव्यतिरिक्त बालकांमध्ये ‘चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल जागृती निर्माण व्हावी आणि गुन्हा घडण्यापूर्वीच गुन्हेगारांना रोखण्याची क्षमता बालकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी सेमिनार शाळा पातळीवर घेतले जातात. मुलांच्या पालकांना या कार्यक्रमात समाविष्ट करून घेऊन पालकांमध्येही जनजागृती व्हावी यासाठी चाईल्ड लाईन कार्य करते. अहमदनगर शहरातील विविध झोपडपट्ट्यामध्ये मुलांना एकत्रित करून चाईल्डलाईन अनेक उपक्रम राबवते.

       सन २००३ पासून चाईल्ड लाईन अहमदनगर शहरातील मुख्य लालबत्ती भागात काम करत असून येथील अनेक अल्पवयीन मुलींना या देहव्यापाराच्या चक्रव्युहातून बाहेर काढले आहे. संपूर्ण अहमदनगर जिल्हा बाललैंगिक शोषणातून पूर्णपणे मुक्त झालेला देशातील पहिला जिल्हा ठरला आहे. अशा प्रकारे चाईल्ड लाईन ही प्रत्येक बालकांपर्यंत पोहचून त्यास सुरक्षा, निवारा व न्याय प्रदान करून बालप्रिय राष्ट्र निर्माण करण्यास कटीबद्ध आहे. असे चाईल्ड लाईन तर्फे नमूद करण्यात आले.

         अहमदनगर जिल्ह्यात बालकांसोबत काम करत असताना मुख्यतः व्यसनाधीन पालकांचे मुलांकडे झालेले दुर्लक्ष व यातून उदभवणा-या अनेकविध समस्या समोर आल्या आहेत. बालकांचे व्यसनाकडे होणारे आकर्षण, प्रेम-प्रकरण, यातून निर्माण होणारे अनैतिक संबंध व बालविवाह, बालभिक्षुकी, बालकामगार, बालगुन्हेगारी, कुमारीमाता या त्यातीलच काही समस्या आहेत. अशा बालकांसोबत काम करताना या बालकांची मानसिकताही खूप वेगवेगळी आहे हे बघायला मिळाले याचे कारण म्हणजे ज्या वातावरणातून ही मुळे येतात तेथे गुन्हेगारी आणि अत्याचार ही सामान्य बाब असते. अशा वेळी या मुलांना त्या वातावरणातून समुपदेशनाच्या माध्यमातून बाहेर काढून त्यांचे पुनर्वसन संवेदशीलतेने हाताळणे हे एक मोठे दिव्य असते आणि स्नेहालयाच्या सोबतीने चाईल्डलाईनने हे कार्य उत्तमरीत्या पार पाडले आहे.

           गेल्या वर्षभरातील आढावा घेतला असता अनेक आव्हानात्मक केसेस चाईल्ड लाईनने हाताळल्या आहेत. बालविवाह हा सुद्धा एक अभिशाप अहमदनगर जिल्ह्याला गेल्या अनेक वर्षांपासून लाभला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी चाईल्ड लाईनकडे निनावी समाजातील एका बालविवाहाची माहिती मिळाली आणि टीम धावतच घटनास्थळी तालुक्याला पोहोचली. ज्या घरी बालविवाह होता ते गावापासून कित्येक मैल लांब होते आणि जाण्यासाठी साधन म्हणजे फक्त गाडी. अशा वेळी मोठ्या हिमतीने टीम ऐन लग्नाच्या मुहूर्ताला घटनास्थळी पोहोचली आणि निनावी समाज गराडा करून टीमभोवती उभा राहिला. अशा वेळी त्या गावक-यांना समजूत घालून आणि वेळप्रसंगी कायद्याचा धाक दाखवून बालविवाह रोखणे हे एक जिकीरीचे काम होते आणि ते चाईल्ड लाईन टीमने यशस्वीरीत्या पार पाडले. सर्व गावक-यांची मनधरणी करून त्या मुलीला या मोहजालातून वाचवले आणि दिव्य पार पाडल्याची अनुभूती टीमला आली. या आणि अशा अनेक केसेस चाईल्ड लाईन टीमने पार पाडल्या आहेत.

     चाईल्ड लाईन ही विविध माध्यमाद्वारे समाजापर्यंत पोहचते. त्यासाठी आउटरीच, पथनाट्य ,शहरामध्ये जनजागृती शासकीय-निमशासकीय यंत्रणांना भेट, शाळा भेट, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, रात्र-फेरी, अशा गोष्टी नियोजीत केल्या जातात. तसेच बालमित्र शिबीर, स्वसंरक्षण कार्यशाळा. चाईल्ड लाईन से दोस्ती सप्ताह, बालमित्रांसाठी बालमित्र सप्ताह, चाईल्ड लाईन कार्यकर्ते व स्वयंसेवकांसाठी कार्यशाळा असे अनेक उपक्रम राबविले जातात.

      फक्त केसेस हाताळणे आणि मुलांची सुटका करणे इथपर्यंतच येऊन चाईल्ड लाईन थांबलेली नाहीये. याव्यतिरिक्त बालकांमध्ये ‘चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल जागृती निर्माण व्हावी आणि गुन्हा घडण्यापूर्वीच गुन्हेगारांना रोखण्याची क्षमता बालकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी कार्यशाळा पातळीवर घेतले जातात. मुलांच्या पालकांना या कार्यक्रमात समाविष्ट करून घेऊन पालकांमध्येही जनजागृती व्हावी यासाठी चाईल्ड लाईन कार्य करते. अहमदनगर शहरातील विविध झोपडपट्ट्या -मध्ये मुलांना एकत्रित करून चाईल्डलाईन अनेक उपक्रम राबवते. चाईल्ड लाईनच्या प्रत्येक केसेस, कार्य, जनजागृतीसाठी केंद्र समन्वयक श्री. महेश सूर्यवंशी, समुपदेशक श्री. अलिम पठाण, सदस्य श्री. शाहिद शेख, श्री. अब्दुल खान, कु. मंजुषा गावडे, श्री. राहुल कांबळे, कु. मनीषा बनकर  व श्री. राहुल वैराळ हे परिश्रम घेत आहेत.  


                                                                                      

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top