अंमली पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांची जनमानसांमध्ये प्रभावीपणे जागृती करा. - जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले.
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या कार्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा.
अहमदनगर, प्रतिनिधी.(16 नोव्हेंबर.) :- अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर घातक असे दुष्परिणाम होतात. या दुष्परिणामांची सर्व सामान्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये प्रभावीपणे जागृती करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात अंमली पदार्थाची वाहतूक, लागवड होऊ नये यादृष्टीने समितीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले बोलत होते.
बैठकीस अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गणेश पाटील, अन्न व औषध विभागाचे जे. एच. शेख, डॉ. डी.एम. दरंवले वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद सायगावकर यांच्यासह समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, अंमली पदार्थांच्या सेवनापासून होणाऱ्या दुष्परिणामांची सर्व सामान्यांना माहिती व्हावी या दृष्टिकोनातून सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात होर्डिंगद्वारे जनजागृती करण्याबरोबरच इतर माध्यमांचा वापरही प्रभावीपणे करून जनजागृती करण्यात यावी. विशेषतः महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयात जनजागृतीपर कार्यक्रमांचे, बैठकांचे आयोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी दिल्या.
अंमली पदार्थांची वाहतूक पोस्ट अथवा कुरियर सेवेमार्फत होण्याच्या अनेक घटना घडत असतात. जिल्ह्यात अशा प्रकारे वाहतूक होऊ नये यासाठी पार्सलची कसून तपासणी करण्यात यावी. अनेकदा शेतीमध्ये नशा आणणाऱ्या पदार्थांची लागवड करण्यात येते. जिल्हयात अशाप्रकारे पदार्थांची लागवड करून उत्पादित होणाऱ्या पदार्थांची माहिती देण्याची जबाबदारी त्या त्या गावातील पोलीस पाटलांवर सोपविण्यात येऊन अशा उत्पादकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी दिले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी समितीमार्फत करण्यात आलेल्या कामकाजाची माहिती दिली.