चार आरोपींना दोन वर्षांची सक्त मजुरी.- एसटी चालक मारहाण प्रकरण.
अहमदनगर, प्रतिनिधी. (१९. नोव्हेंबर) : कर्जत-जामखेड आगाराचे चालक हनुमंत कदम हे दिनांक 27 जुन 2018 रोजी त्यांची बस जामखेड वरुन कर्जत कडे येत असताना त्यांना थांबवून स्वीप्ट गाडीतुन उतरुन त्यांना मारहाण करून,गंभीर जखमी केले होते. त्यांची चौकशी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.एन.जी.शुक्ल साहेब यांचे समोर होऊन चारही आरोपींना भा.द.वि कलम 353 अन्वये दोशी धरुन दोन वर्षे सक्त मजूरी व प्रत्येकी 1000/ - रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 27 जुन 2018 रोजी फिर्यादी हनुमंत कदम बस चालक जामखेडहून निघुन कर्जत कडे येत असताना दुपारी 4:15 चे सुमारास माहीजळगावचे पुढे समोरुन स्वीप्ट गाडी आली व मधोमध उभी राहीली.त्यावेळेस बस चालकाने त्यास गाडी थोडी बाजूला घे असे म्हणाले असता, आरोपी यांनी चालक यांना खाली ओढून मारहाण केली.त्यातील एका आरोपीने त्यांच्या नाकावर मारुन गंभीर जखमी केले व नंतर ते त्यांची गाडी घेऊन निघुन गेले. घटनेनंतर चालक यांनी त्यासंदर्भात कर्जत पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. सदरच्या गुन्ह्याच्या तपास पी.एस.आय एस.डी.पालवे यांनी करुन त्यांनी गुन्ह्यात वारलेली गाडी तसेच चारही आरोपींना अटक करत दोषारोपत्र पाठवले. सदर केसची चौकशी जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांचे समारे होऊन त्यात आरोपी सचिन दिलीप पवार वय 25 वर्षे, राहूल चंद्रकांत गाडे वय 24 वर्षे, हुसेन इब्राहिम मुलानी वय 24 वर्षे, अभिजीत तान्हाजी जगदाळे वय 22 वर्षे सर्व रा. भिगवण ता. इंदापूर, जि. पुणे यांना 2 वर्षे सक्त मजूरी व प्रत्येकी 1000/ - रुपये दंडाची शिक्षा सुनावली.त्यामध्ये फिर्यादी व तपासी अधिकारी डॉक्टर व पंच साक्षीदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील अनिल एम.घोडके यांनी काम पाहिले.पैरवी अधिकारी सौ.आशा खामकर यांनी सहकार्य केले.