2022-23 या वर्षासाठी 753.52 कोटी रुपयांचा निधी मंजूर.- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
अहमदनगर,प्रतिनिधी.(24 डिसेंबर) : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून दरवर्षी यंत्रणांना मागणीनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येतो.सन 2022-23 या वर्षासाठी 753.52 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर असुन सर्व विभागांनी हा निधी पूर्णपणे खर्च होईल, यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे.तसेच सर्व विभागांनी येत्या तीन दिवसांमध्ये प्रशासकीय मान्यतेसाठीचे प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर करण्याचे निर्देश राज्याचे महसुल, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री.विखे पाटील बोलत होते.यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार डॉ.किरण लहामटे, आमदार मोनिका राजळे, आमदार लहू कानडे, आमदार संग्राम जगताप,आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे,अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच सर्वसामान्य जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनच्या इमारतीमध्ये सुरु करण्यात आलेल्या पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ राज्याचे महसुल, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.