जेऊर मधील सद्गुरु आवारे ट्रस्टचा अनोखा उपक्रम.- देशी गाईंना मिळाला हक्काचा निवारा.

Ahmednagar Breaking News
0

जेऊर मधील सद्गुरु आवारे ट्रस्टचा अनोखा उपक्रम.- देशी गाईंना मिळाला हक्काचा निवारा.

अहमदनगर,प्रतिनिधी.(०२.डिसेंबर.) : देशी गायी आजारी किंवा भाकड झाल्यास त्यांना कत्तलखान्याचा रस्ता दाखवला जातो. काही मोकाट सोडून दिल्या जातात.मात्र, अशा गायींना जेऊरच्या तरुणांमुळे मायेचा आधार मिळाला आहे. परिसरातील जर्जर अवस्थेतील देशी गायी एकत्र आणून या तरुणांनी त्यांच्यासाठी निवारा उभारला आहे. पदरमोड करून त्यांचा सांभाळ केला जात आहे.सद्गुरू साहेबराव आवारे ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.चंपाषष्ठीच्या दिवशी (ता. २९) गोशाळेचे लोकार्पण झाले आहे.

   


         या तरुणांनी यापूर्वी मोफत अन्नछत्र, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास व्हावा म्हणून मार्गदर्शन केंद्र वाचनचळवळ वाढावी यासाठी मोफत वाचनालय सुरू केले.आता त्यांनी हा आणखी एक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. या सेवेचे त्यांनी श्री संतुकनाथ गोशाळा असे नामाभिधान केले आहे. कत्तलखान्यात जाणाऱ्या गायींची सुटका करून त्यांना निवारा, चारा-पाणी व वैद्यकीय सेवा पुरवून त्यांची देखभाल केली जाते. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक केले जातआहे. परिसरातील सुनील पवार, दत्ता शिकारे, सचिन मगर, संदीप तवले,स्वप्नील तवले, किशोर ससे, मयूर तोडमल, सुधीर पवार, विठ्ठल दारकुंडे,गिरीश मगर, वैभव तोडमल, नवनाथ मगर आदींचा हा कर्मयोग सुरू आहे.

         


 

           हे तरुण रुग्णांच्या मदतीलाही धावून जातात. दुर्धर आजार,अवघड शस्त्रक्रियेसाठी गरीब रुग्णांना आर्थिक मदत देतात.रक्तदानसारखे शिबिरे घेतात.सद्गुरू साहेबराव आवारे यांच्या प्रेरणेतून तरुण विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवीत आहेत. बायजामाता यांच्या नावाने त्यांनी मोफत अन्नछत्र उभारले आहे. सेवा हाच धर्म,हे ब्रीद घेऊन ते काम करीत आहेत. 

       सदगुरु साहेबराव आवारे हे सिद्धपुरुष म्हणून साधकवर्गात विख्यात आहेत. ते सिद्धहस्त लेखकही आहेत. भगवद्गीता, योगशास्त्र, शिवसूत्र,पसायदानावर त्यांचे ग्रंथ आहेत. महाराष्ट्र सरकारचा त्यांना उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कारही मिळाला आहे. संस्कृत, अर्धमागधी, पाली,उर्दू, बंगाली, मराठी, हिंदी, इंग्रजी आदी भाषा अवगत असल्याने ते बहुभाषाकोविद म्हणून प्रसिद्ध आहेत. ध्यानशिबिरे, प्रवचनांतून त्यांनी साधकांना सन्मार्गाला लावले आहे. जेऊरसह राज्यातील हजारो तरूण त्यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन सामाजिक, धार्मिक काम करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top