नामांकित डॉक्टरनी केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग पोलिसांनी केला गुन्हा दाखल.
नगर,प्रतिनिधी.(५. नोव्हेंबर) : एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल,असे बोलत विचित्र हावभाव करणाऱ्या व्यक्तीविरोधात रविवारी (दि.४ डिसेंबर) रोजी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.हा प्रकार २९ नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास संगमनेरातील एका वसतिगृहात घडला. डॉ.इथापे (संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पीडित मुलगी अकोले तालुक्यातील रहिवासी आहे. मुलीच्या घरापासून शाळा लांब असल्याने तिला संगमनेरातील एका विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल केले.ती एका वसतिगृहात राहते.३० नोव्हेंबरला रात्री नऊच्या सुमारास पीडित मुलीने एका मॅडमच्या मोबाइलवरून तिच्या बहिणीला फोन केला. ती बोलता- बोलता रडत होती.बहिणीने तिला रडण्याचे कारण विचारले असता तिने सांगितले की,२९ नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास डॉ.इथापे सर हे बाहेर जाण्याकरिता त्यांचे गाडीने निघाले असल्याने एका मॅडमने मला वसतिगृहाचे दार उघडायला सांगितले.त्यावेळी सर फोनवर बोलत होते. म्हणून मी माझ्या मैत्रिणीला बोलावून घेतले.त्यानंतर सर मला जे काही बोलले त्यातून माझ्या मनात लज्जा उत्पन्न झाली. पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९, तसेच भारतीय दंड संहिता १८६० च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.