श्री.गजानन महाराज प्रकटदिन सोहळा उत्साहात साजरा.
नगर,प्रतिनिधी.(14. फेब्रुवारी.) : श्री.गजानन महाराज प्रकटदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून आणि नगरसेविका सौ.ज्योती अमोल गाडे यांच्या विशेष प्रयत्नातून श्री.गजानन महाराज मंदिरासाठी तयार केलेल्या भव्य सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेविका सौ ज्योती अमोल गाडे, नगरसेवक अजिंक्य बोरकर, विपुल शेटीया, रामदास आंधळे, योगीराज गाडे, रवींद्र बारस्कर,माणिक विधाते,अमोल गाडे,संपत नलावडे,राजू मंगलारप,संजय घुले,संभाजी पवार,विजय गव्हाळे,अमित गटणे, सुमित कुलकर्णी, करण भळगट,तसेच शहरातील विविध सामाजिक,राजकीय प्रतिष्ठितांसह शासकीय अधिकाऱ्यांनी देखील दर्शनासाठी हजेरी लावली आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मंदिर प्रशासनाकडून आलेल्या मान्यवरांचा शाल,श्रीफळ,गुलाब पुष्प आणि श्री गजानन महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील नवले नगरमधील श्री गजानन महाराज यांच्या मंदिरात प्रकटदिन मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.सोमवारी पहाटे श्री.गजानन महाराज यांना लघु रुद्र अभिषेक करण्यात आला.त्यानंतर भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली,यावेळी पालखी मिरवणूक मार्गांवर आणि परिसरात महिला भगिनींनी रंगीबेरंगी रांगोळी काढून आकर्षक दारापुढे सजावट केल्याने भक्तिमय वातावरण तयार झाले होते. गण गण गणात बोते या नाम घोषणा देत भाविकांनी पालखीमध्ये गजानन महाराजांची मूर्ती व पादुका ठेवून मिरवणुकीत सहभाग नोंदविला.ठिकठिकाणी पालखीचे स्वागत रहिवाशांनी केले. दुपारी ठीक 11.45 ला मिरवणूक मंदिरात आली.त्यानंतर महाआरती करण्यात आली.त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली.
संध्याकाळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे मंदिरात दर्शनासाठी आले. त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, निखिल वारे हे होते.श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सुजय विखे पाटील यांनी परिवाराच्यावतीने उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्यात.