असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.- नेत्रदूत जालिंदर बोरुडे.
नगर,प्रतिनिधी.(07.फेब्रुवारी.) : ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’असे प्रतिपादन फ़िनिक्स सोशल फौडेशनचे अध्यक्ष व नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल येथील सुमती फडणीस नेत्र शस्त्रक्रिया विभागाचे लोकार्पण करताना केले.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक जेष्ठ नागरिक व गरजू रुग्णांना मोती बिंदू व इतर दर्जेदार नेत्र उपचार अल्पदारात या नवीन विभागाद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री. जालिंदर बोरुडे म्हणाले की मानवी शरीरात डोळे, दंत व हृद्य या तीन अतिमहत्वाच्या संवेदनशील अवयांवर प्रामुख्याने त्वरित उपचार मिळणे आवश्यक असते. परंतु अतिखर्चिक उपचारांमुळे अनेकांना यापासून वंचित राहून वेदनेसह जगावे लागते. पैशांची व्यवस्था केली तरीही उपचारासाठी पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात जावे लागते जिथे राहणे-खाणे, जाणे-येणे हा अतिरिक्त खर्च परवडत नाही. स्नेहालय संस्थेने ही गरज ओळखून अहमदनगर शहरातच ही डोळ्यांची अत्यावश्यक सेवा सुरु केली असल्याने मला विशेष आनंद होत आहे.यावेळी कै.सुमती फडणीस नेत्र शस्रक्रिया विभागाला सर्व आधुनिक साहित्य घेण्यासाठी सहयोग देणारे धामणकर व फडणीस कुटुंबीय उपस्थित होते. अखिला फडणीस, अभिषेक फडणीस, मंजिरी धामणकर, डॉ.तन्मयी धामणकर, डॉ.जॉय घोष आणि सौ. सक्सेना यांनी कै. सुमती फडणीस यांच्या स्मृती या स्वरुपात जागृत राहाव्यात या उद्देशाने हा सहयोग दिला आहे. मागील पिढीतील वैद्यकीय व अध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या स्व. डॉ ह.न.फडणीस आणि सुमती फडणीस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांनी हा सहयोग दिला आहे. डॉ.ह. न. फडणीस व त्यांच्या पत्नी सुमती यांनी स्त्री रुग्णालयाची स्थापना करून महिलांसाठी उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा पुण्यात उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या कुटुंबांनी त्यांची वैद्यकीय सेवेची परंपरा पुढे नेत स्नेहालय संस्थेतील रुग्णालयास या नवीन विभागासाठी सहयोग दिला आहे.
सर्व प्रकारच्या नेत्र विकारांवर रुग्णांची नियमित तपासणी, निदान,सल्ला व उपचार नेत्र तज्ञ डॉ.आजीता गरुड-शिंदे व डॉ.रावसाहेब बोरुडे यांनी आपला वेळ देण्याचे मान्य केले आहे. कार्यक्रमाला सिव्हील हॉस्पिटलचे वरिष्ठ अधिकारी डॉ.विक्रम पानसंबळ, डॉ.आजीता गरुड-शिंदे , डॉ.रावसाहेब बोरुडे, डॉ.गिरीश कुलकर्णी, संजय गुगळे, राजीव गुजर, संजय बंदिष्टी,राजेंद्र शुक्रे,हनीफ शेख, अनिल गावडे, प्रवीण मुत्याल, प्रा गुरुराज कुलकर्णी, डॉ.प्रीती भोंबे आदी मान्यवर उपस्थितीत होते. केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे डॉ.अर्चना लांडे, अजिंक्य भिंगारदिवे, मिल्का बोरुडे, सुचिता पुरनाळे, पल्लवी वाघमारे, प्रियंका बटूळे, वैशाली पंडोरे, कीर्ती कटके, श्री.पवन तंगडे, अनिकेत रानमाळे,रीना जगदेव व अनिकेत धायटे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.