छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर सबंध भारताचे आराध्य दैवत. - सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मगर.
नगर प्रतिनिधी. (20.फेब्रुवारी.) : नगर तालुक्यातील जेऊर गावचे भूमिपुत्र आणि भुषण सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मगर यांच्या हस्ते शिवपूजन आणि शिवारती करण्यात आली. याप्रसंगी राजेंद्र मगर यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर सबंध भारताचे आराध्य दैवत असून त्यांचेबाबत आपले विचार मांडताना छत्रपतींनी आपल्या मावळ्यांना सोबत घेवून एकनिष्ठ सैन्यदल तयार करून परकीय शत्रूंना पराजित करून हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली. त्यांनी पर स्री मातेसमान मानून गोर गरीब यांना न्याय देवून रयतेचा राजा म्हणून नावलौकिक निर्माण केला.त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. त्यांच्या गनिमी काव्याचे व्हिएतनाम इस्राएल या देशांनी अनुकरण करून शत्रूला नामोहरम केले.बहिर्जी नाईक यांच्या सारखे कर्तव्य दक्ष गुप्तहेर निर्माण करून आरमार दलाची स्थापना करून अनेक गडकिल्ले व जलदुर्ग सर केले याबाबत सांगितले.
रक्तदान शिबीर जेऊरमधील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते याचे उदघाटन करण्यात आले. रक्तदानातून अष्टविनायक ब्लड बँके मार्फत 44 बॅग्स ब्लड जमा करण्यात आले.तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी चालवणे असे विविध पारंपरिक युद्धप्रकाराचे प्रदर्शन नगर मधील पथकाने केले.शिवप्रतिमेची गावामधून घोड्यांच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली.बुऱ्हानगर येथील झांज/डफ/ताशा/ढोल या पथकाने मिरवणुकीत रथासमोर आपल्या कलेचे उत्तम प्रदर्शन केले. रथ मार्गावर गावातील भगिनींवर्गाने सडा-रांगोळी केली होती.आणि ठिकठिकाणी महाराजांचे औक्षण केले.तरूणाईची महाराजांप्रती असलेली निष्ठा/प्रेम/उत्साह हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देताना आणि DJ समोर ओसंडून वाहत होती.DJ वर फक्त राजांचीच गाणी वाजवण्यात आली.आपल्या राजांच्या जन्मोत्सव कार्यक्रमात कोठेही गालबोट लागू नये याची युवकांनी काळजी घेतली.या प्रसंगी फटक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयात या वर्षी दोन गटामध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना छान पुरस्कारही देण्यात येणार आहेत. शिवजयंती उत्सवाचा ताळेबंद लवकरच आपल्या समोर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मांडण्यात येईल.मागील आणि या वर्षीच्या शिवजयंतीला परिसरातील सर्व लोक आपापसातील राग-द्वेष आणि गट-तट विसरून एकत्र आले आणि राजांचा एक भव्य-दिव्य जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.तरुणांनी विविध कामे आपल्या खांद्यावर घेतली आणि पूर्णत्वास नेली. गावातील अशी सर्व सकारात्मक शक्ती एकत्र आली तर आपण आपले गाव एक आदर्श गाव शिव छत्रपतींच्या आशिर्वादाने बनवू शकतो.
आपण पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी रयतेच्या सहकार्याने शिवछत्रपती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. सर्वांनी आपापल्या परीने तण मन आणि धनाने सहकार्य केले. सर्वांचे शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने खूप खूप आभार.