महा पशुधन एक्सपोच्या मंडप उभारणीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ महिलांच्या उपस्थितीत संपन्न.

Ahmednagar Breaking News
0

महा पशुधन एक्‍सपो हे देशपातळीवरील प्रदर्शन युवा शेतक-यां बरोबरच महिलांना सुध्‍दा मार्गदर्शक आणि नवी प्रेरणा देणारे ठरणार. - सौ.शालिनीताई विखे पाटील.

शिर्डी,प्रतिनिधी. (20. मार्च.) : महा पशुधन एक्‍सपो हे देशपातळीवरील प्रदर्शन युवा शेतक-यांबरोबरच महिलांना सुध्‍दा मार्गदर्शक आणि नवी प्रेरणा देणारे ठरणार आहे. पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या संकल्‍पनेतून आयोजित करण्‍यात आलेल्‍या या प्रदर्शनाच्‍या यशस्‍वीतेसाठी शिर्डी मतदार संघातील सर्व नागरीकांनी आणि कार्यकर्त्‍यांनी योगदान द्यावे असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

शिर्डी येथील शेती महामंडळाच्‍या भव्‍य अशा प्रांगणात दिनांक २४ ते २६  मार्च या दरम्‍याने पशुसंवर्धन विभागाच्‍या वतीने देशपातळीवरील महा पशुधन एक्‍सपोचे आयोजन करण्‍यात आले आहे. या प्रदर्शनाकरीता शेती महामंडळाच्‍या जमीनीवर भव्‍य असे मंडप उभारणीचे काम सुरु करण्‍यात आले आहे. या मंडप उभारणीच्‍या कामाचा भुमिपुजन समारंभ आज महिलांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाला.

जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, महानंदाचे चेअरमन राजेश परजणे, माजी नगराध्‍यक्ष शिवाजीराव गोंदकर, कैलास कोते, तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, शहर अध्‍यक्ष सचिन शिंदे, ओबीस आघाडीचे बाळासाहेब गाडेकर, बाळासाहेब जपे, सरपंच सचिन मुरादे, सरपंच कैलास कातोरे, माजी सभापती सौ.हिराबाई कातोरे, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त शितलकुमार मुकणे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, उपायुक्‍त डॉ.सुनिल तुंबारे यांच्‍यासह स्‍थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सौ.विखे पाटील म्‍हणाल्‍या की, मंत्री विखे पाटील यांच्‍याकडे ज्‍या विभागाचा कार्यभार येतो त्‍यामध्‍ये काहीतरी नवीन करण्‍याची त्‍यांनी हातोटी असते. त्‍या विभागाचा लाभ सामान्‍य माणसाला व्‍हावा यासाठी त्‍यांचे प्रयत्‍न असतात. पशुसंवर्धन विभागाच्‍या  माध्‍यमातून आयोजित केलेले हे प्रदर्शन सुध्‍द राज्‍यासह देशातील शेतक-यांकरीता मार्गदर्शक असे ठरणार आहे.

या प्रदर्शनात देशातील १२ राज्‍यातून विविध  जातींचे पशुपक्षी सहभागी होणार आहेत. परंतू यापेक्षा महत्‍वाचे म्‍हणजे या व्‍यवसायातील शास्‍त्रोक्‍त ज्ञान, गोपालक आणि पशुपालकांना मिळावे म्‍हणून केलेले आयोजन हे जिल्‍ह्यातील शेतक-यांसाठी उपयुक्‍त ठरणार आहेच, परंतू यापेक्षाही गोपाल व्‍यवसायातही आता महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात असतो त्‍यामुळे हे प्रदर्शन महिलांसाठी सुध्‍दा पर्वणी ठरेल. प्रत्‍येक कार्यकर्त्‍याने, संस्‍थाच्‍या पदाधिका-यांनी गावातील महिला, बचत गटांच्‍या सदस्‍या यांना हे प्रदर्शन पाहण्‍यासाठी सक्रीयतेने पाठवावे असे आवाहनही सौ.विखे पाटील यांनी केले.

भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी आपल्‍या भाषणात भारतासारख्‍या कृषिप्रदान देशात गोधनाचे असलेले महत्‍व लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांनी पशुसंवर्धन विभागाच्‍या माध्‍यमातून आयोजित केलेले प्रदर्शन ही एक मोठी संधी आहे. राज्‍य सरकारनेही आता गोवंश गोसंवर्धन यासाठी घेतलेले निर्णय हे दूग्‍ध व्‍यवसायाच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण असल्‍याने शिर्डीमध्‍ये होणारे हे प्रदर्शन दिशादर्शक ठरेल असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.

पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्‍त शितलकुमार मुकणे यांनी या प्रदर्शनात तीन दिवस आयोजित केलेल्‍या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. पशुसंवर्धन विभागाच्‍या वतीने सर्व मान्‍यवरांचे स्‍वागत करण्‍यात आले व उपायुक्‍त डॉ.सुनिल तुंबारे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top