राहाता पंचायत समितीचा यशवंत पंचायत राज अभियानात नाशिक विभागात प्रथम क्रमांक.
राहाता,प्रतिनिधी. (16. मार्च.) : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय व्यवस्थापनाचा उत्कृष्ठ दर्जा राखल्यामुळे राहाता तालुका पंचायत समितीला विभाग पातळीवरील यशवंत पंचायत राज अभियान २०२२-२३ करीता प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
ग्रामीण भागाच्या विकासात पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण विकासाच्या सर्व योजना पंचायतराज संस्था मार्फत राबविल्या जातात. राहाता पंचायत समितीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची केलेली अंमलबजावणी तसेच राबविलेले विविध सामाजिक उपक्रम यामुळे विभाग स्तरावर पंचायत समितीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी वेळोवेळी विकास कामांसाठी उपलब्ध करुन दिलेला निधी वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने केलेला पाठपुरावा आणि तालुक्यातील विकासाच्या संदर्भात युवा नेते खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सर्व गावांना विकास प्रक्रीयेत सामावुन घेण्यासाठी केलेली प्रभावी कार्यवाही आणि शासन आपल्या दारी या उपक्रमातुन वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांना केलेले मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळेच प्रशासकीय स्तरावर राहाता पंचायत समितीचा दर्जा गुणात्मकदृष्ट्या यशस्वी झाल्याचे या पुरस्कारातून स्पष्ट झाले.
राहाता पंचायत समितीला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आ.राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील यांनी पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि आधिका-यांचे अभिनंदन केले आहे.