राज्यात रोजगार निर्मितीला प्राधान्य देणाऱ्या अर्थसंकल्पाचे स्वागत.- खासदार डॉ.सुजय विखे पाटील.
नगर,प्रतिनिधी.(09. मार्च.) : राज्यात रोजगारक्षम वातावरण निर्माण करुन, रोजगार निर्मितीला प्राधान्य देणा-या अर्थसंकल्पाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्वागत केले असून, शेतक-यांसाठी शेतकरी महानिधी सन्मान योजना आणि नगर जिल्ह्यातील शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी अर्थसंकल्पातून केलेल्या निधीच्या तरतुदी बद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया व्यक्त करताना खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा लोकाभिमुख, जनतेच्या हिताचा आणि राज्याच्या सर्वसमावेशन विकासाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी,महिला, दलित, अल्पसंख्याक आणि मगासवर्गीय समाजातील घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या नवीन योजनांमुळे सामाजिक विकासाला पाठबळ मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगर जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय तसेच शेळी मेंढी सहकारी विकास महामंडळाचे मुख्यालय आणि शिर्डी विमानतळासाठी ५२७ कोटी रुपयांची केलेली तरतुद ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बाब ठरणार असल्याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले.