अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी पुढील महिन्यापासून-खा.डाॅ.सुजय विखे पाटील.
श्रीगोंदा,प्रतिनिधी.(04.मार्च.) : अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची असलेली जमिनी मोजणीची मागणी महसूल मंत्री तथा आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंजूर केली असून पुढील महिन्यापासून ही मोजणी सुरू होणार असल्याचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. ते श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते, बाळासाहेब नाहाटा,सुरेशराव रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना खा.विखे म्हणाले की या परिसरातील अनेक शेतकर्याकडून जमिनीची मोजणी करण्याची मागणी करण्यात आली, या बरोबरच फेरफार या सारख्या महसूली कामाबाबत सातत्याने पाठपुरावा होत होता यावर महसूल मंत्री तथा आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक व्यापक स्वरूपाची मुंबईत वरिष्ठ आधिकारया समवेत बैठक घेऊन निर्णय घेतला आहे, पुढील महिन्यात अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेत जमिनीची मोजणी होणार असून या करिता तात्काळ आपले अर्ज तहसिल तसेच योग्य त्या कार्यालयात द्यावे असे सांगून आपल्या सरकारचा आपल्या माणसासाठी उपयोग व्हावा या करिता आम्ही काम करतो असे सांगितले. ही मोजणी देखील अत्याधुनिक उपकरणाच्या साह्याने आणि वेळेत पूर्ण करणार असल्याचे खा.विखे यांनी सांगतानाच कुठल्याही प्रकारचा यात गैरप्रकार होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत असे सांगितले.आपण सर्वांनी पुढील पिढीच्या बाबतीत विचार करून आपला गावाचा विकास करून घेण्यासाठी जो पुढाकार घेईल अशा व्यक्तींनाच स्थान द्यावे असे शेवटी त्यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.