शिर्डी संस्थांनमध्ये शेतकऱ्यांमार्फत फुलविक्रीचा लवकरच निर्णय - पालकमंत्री नामदार विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

नांदुर्खी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री ना.विखे पाटलांच्या हस्ते करण्यात आले.

शिर्डी,प्रतिनिधी.(22.मार्च.) : शिर्डी येथील फुलविक्री बाबत जिल्हाधिकारी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून पुढील दहा दिवसांत संस्थांनमध्ये फुलविक्री सुरू करण्यात येईल. यात फक्त आजूबाजूच्या परिसरातील सातबाराधारक शेतकऱ्यांना फुल विक्रीला परवानगी देण्यात येईल.‌अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिली.

राहाता तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण व विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते . यावेळी‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. 

संस्थान दर्शनरांगेत अधिकृतरित्या फुलविक्री सुरू करण्यात येईल. असे स्पष्ट करत पालकमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, शिर्डी येथे श्री‌.साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गरज लक्षात घेऊन आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी शेती करावी.शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लॅंडीग सेवा सुरू होणार आहे‌‌. ५०० कोटींच्या नवीन टर्मिनला मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे या विमानतळावर एकाचवेळी दहा विमाने थांबतील. याचबरोबर समृध्दी महामार्गामुळे आजूबाजूच्या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे. शिर्डीच्या उत्पन्नात भर पडणार आहे‌. 

सरकारी वाळू लिलाव बंद करण्यात येऊन शेतकऱ्यांना घरपोच जागेवरच ६०० रूपये ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात येईल. यातून सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व पाणंद व शिवरस्ते मोकळे करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. शेतजमीन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर एक महिन्याच्या आत रोव्हर तंत्रज्ञानाने मोजणी करून शेतकऱ्यांना नकाशा प्रमाणपत्र देण्याच्या उपक्रम अहमदनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाला आहे. असे पालकमंत्री श्री. विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले. 

पालकमंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, राहाता, संगमनेर मधील शेतकऱ्यांना विम्यापोटी साडेआठ कोटी रूपयांची भरपाई देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामांचे फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत‌.शासनाच्या पैसाचा अपव्यय थांबविण्यासाठी कोणाला पाठीशी घातले जाणार नसल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.ग्रामपंचायत इमारत विकासाचे मंदीर आहेत. यामुळे गावपातळीवरील विकासाला चालना मिळणार आहे. असे श्री. विखे-पाटील यांनी सांगितले. 

पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांच्या हस्ते यावेळी नांदुर्खी बुद्रुक येथील १ कोटी ६९ लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.माजी मंत्री आण्णासाहेब  म्हस्के पाटील यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या शिर्डी शाखेचे उद्घाटन २६ मार्च रोजी होणार असल्याची माहिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिली.

यावेळी व्यासपीठावर शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, संगमनेर प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, पंचायत समितीचे किरणकुमार आरगडे, संजयकुमार गायकवाड, देविदास धापटकर, नांदुर्खी सरपंच माधवराव चौधरी, उपसरपंच विरेश चौधरी, राजेंद्र चौधरी, काशिनाथ गुंजाळ, बाळासाहेब डांगे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top