पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडू नये.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.
अहमदनगर,प्रतिनिधी. (07. एप्रिल.) : जिल्ह्यात विविध सण उत्सव जयंती हे या महिन्यात मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. या काळात सामाजिक वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न काही दुष्ट प्रवृत्ती करतील अशा वेळी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी कडक कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केल्या.
या बैठकीस महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खा. विखे पाटील म्हणाले की रमजान ईद, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यासह इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सामाजिक माध्यामा द्वारे काही धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या बाबी पसरविल्या जातील अशा वेळी सायबर क्राईम सेल विभागाने अत्यंत सजग राहून या कडे लक्ष ठेवावे. अशा प्रकरणात काही राजकीय दबाव पोलिसांवर येण्याची शक्यता जास्त आहे,त्यामुळे कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता थेट कारवाई करावी असे विखे यांनी सांगून तडीपार गुंडाचा लवकर बंदोबस्त करावा अशा सूचना केल्या. नगर शहरात पुढील पंधरा दिवसात साडेतीनशे सी सी टी व्हीं बसविले जाणार आहेत. त्यामुळे गुन्हेगारीस आळा बसेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान या बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी देखील विविध सूचना मांडल्या या सर्व सुचनांचे स्वागत करून पोलिस विभागास त्या पूर्ण करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.