तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक. - ना.राधाकृष्ण विखे पाटील.
राहाता ,प्रतिनिधी.(03. एप्रिल.) : तालुका स्तरावरील नायब तहसिलदार पद हे अतिशय महत्वाचे असून, त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. या प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेवून दिलासादायक निर्णय करण्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राज्यातील सर्व तहसिलदार आणि नायब तहसिलदार आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. संघटनेचे प्रतिनिधी या नात्याने शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे, अमोल निकम यांनी मागण्यांबाबतचे निवेदन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सादर करुन या मागण्यांबाबत तातडीने निर्णय करावा अशी विनंती केली.
महसूल विभागातील नायब तहसिलदार राजपत्रीत वर्ग २ हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतू या नायब तहसिलदारांच्या पदांचे वेतन हे राजपत्रीत दोन प्रमाणे नसल्याने ग्रेड पे वाढविण्याबाबत १९९८ पासुन नायब तहसिलदार संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे या मागण्यांबाबत लवकरात लवकर निर्णय करावा अशी अपेक्षा संघटनेच्या प्रतिनिधींनी मंत्री विखे पाटील यांच्याशी चर्चे दरम्यान केली.
नायब तहसिलदारांच्या मागण्यांबाबत यापुर्वीही चर्चा झाली आहे. या संदर्भात शासन सकारात्मकच असून, सर्वांना न्याय मिळेल अशीच भूमिका घेतली जाईल. या संदर्भात दोनच दिवसात आपण बैठक बोलावून या मागण्यांबाबत निर्णय होण्याच्या दृष्टीने योग्य ते निर्णय करु अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी शिष्टमंडळाला दिली.