समाजामध्ये अशांतता व तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. - ना.राधाकृष्ण विखे पाटील.
अहमदनगर,प्रतिनिधी. (07.एप्रिल.) : अहमदनगर जिल्ह्याला धार्मिकतेची फार मोठी परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत जिल्ह्यात होणारे सण, उत्सव शांततेत साजरे व्हावेत. जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करावे. तसेच समाजामध्ये अशांतता व तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा.डॉ.सुजय विखे पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालिमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की या महिन्यात पवित्र रमजान ईद, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, यासह इतर धार्मिक, सामाजिक कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमात सर्वत्र उत्साह रहावा कुठलीही धार्मिक तेढ निर्माण करणारी अनुचित घटना घडू नये या करिता पोलिसांनी दबावाला बळी न पडता काम करावे. कायद्याचा बडगा वापरून कायदा व सुव्यवस्था ठेवावी.
जिल्ह्यात धर्मांतर तसेच लव जिहाद अशा घटना आपण खपवून घेणार नाहीत अशा सूचना करताना ना. विखे यांनी अशा पोलिस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. वर्गणी गोळा करणाऱ्या विरुद्ध येणाऱ्या काळात धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचं सांगताना ते म्हणाले की अशा प्रकारातून संघटित गुन्हेगारी वाढते आणि समाजाला त्याचा परिणाम भोगावा लागतो. एवढेच नाही तर सायबर क्राईम सेलच्या बळकटीकणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून बाह्य संस्थेच्या मदतीने अंकुश ठेवणार आहोत. सामाजिक वातावरण चांगल्या प्रकारे राहावे या करिता मोहल्ला कमिटी पुन्हा कार्यान्वित करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
भूमी अभिलेख विभागाचे आधुनिकीकरण करण्यात येत असून राज्याचा पथदर्शी प्रकल्प म्हणून नगर जिल्ह्याची निवड केली आहे. दोन महिन्यात आता मोजणी करून संबंधित शेतकऱ्यास कागदपत्रे देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या विविध प्रश्नाला उत्तर दिले.