ना.दीपक केसरकर 05.मे रोजी पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त लोणीत.

Ahmednagar Breaking News
0

पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती निमित्त राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.दीपक केसरकर 05 मे रोजी लोणीत.

लोणी,प्रतिनिधी.(03. मे.) : शेती,सहकार,जलसिंचन,अर्थ आणि शिक्षण आदि क्षेत्रांच्‍या  माध्‍यमातून ग्रामीण विकासात महत्‍वपूर्ण भूमिका बजावणारे लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा ९१ व्या जयंती दिन राज्‍याचे शालेय शिक्षण मंत्री ना.दीपक केसरकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत  संपन्‍न होणार असून,लोणी येथील व्‍यापारी संकूल व बीओटी तत्‍वावरील बांधण्‍यात आलेल्‍या जिल्‍हा परिषद शाळेचे उद्घटनही होणार असल्‍याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

शुक्रवार दिनांक ५ मे २०२३ रोजी सकाळी १०.वा. पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा अभिवादन समारंभ लोणी बुद्रूक येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर आयोजित करण्यात आला आहे. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांची पुण्‍यतिथी आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधून लोणी ग्रामस्‍थांच्‍या वतीने किर्तन महोत्‍सव आणि तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचे आयो‍जन करण्‍यात आले आहे. या सप्‍ताहाचा सांगता समारोह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्‍या  उपस्थितीत होणार आहे.या जयंती दिनाचे औचित्‍य साधून लोणी येथे बांधण्‍यात आलेल्‍या  जिल्‍हा परिषद शाळेचे लोकार्पण तसेच ग्रामपंचायतीने विकसीत केलेल्‍या  व्‍यापारी संकुलाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री ना.दीपक केसरकर यांच्‍या  उपस्थितीत होणार असून, जेष्‍ठनेते माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के  पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आलेल्‍या या कार्यक्रमास  ह.भ.प उध्‍दव महाराज मंडलिक, राज्‍याचे महसूल, पशुसवंर्धन आणि दूग्‍ध  व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्‍यासह प्रवरा परिवारातील विविध संस्‍थाचे पदाधिकारी आणि जिल्‍ह्यातील मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत.जिल्‍हा परिषदेच्‍या उपाध्‍यक्ष पदापासुन ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत आपल्‍या कार्यकर्तृत्‍वाची गरुड झेप घेताना पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी सामान्‍य माणसाच्‍या हितासाठीच अखेरपर्यंत कार्य केले. सहकाराचा मंत्र कृतीत उतरवून ग्रामीण विकासाला त्‍यांनी नवा आयाम प्राप्‍त करुन दिला. शेती, शिक्षण, पाणी, अर्थकारण, आरोग्‍य  आदि क्षेत्रात त्‍यांनी केलेल्‍या सुचनांचे धोरणामध्‍ये रुपांतर झाले. याचा लाभ शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि सामान्‍य नागरीकांना होत आहे.पाणी परिषदेच्‍या माध्‍यमातून मांडलेल्‍या नदीजोड संकल्‍पनेची अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारने सुरु केली. तसेच खासदार साहेबांनी यापुर्वी केलेल्‍या कौशल्‍य  शिक्षणाविषयीचा अंतर्भावही केंद्र सरकारने नव्‍या शैक्षणिक धोरणात केला ही समाधानाची बाब असल्‍याचे खा.डॉ.विखे पाटील म्‍हणाले. आयोजित करण्‍यात आलेल्‍या या अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याचे आवाहन प्रवरा परिवाराच्‍या  वतीने करण्‍यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top