लोणी बुद्रुक येथील हरिनाम सप्ताहाची सांगता.

Ahmednagar Breaking News
0

खरे कृष्ण चरित्र लोकांपुढे येऊ न देण्याचे काहींचे षडयंत्र. - उद्धव महाराज.


लोणी,प्रतिनिधी.(05.मे.) : जगातील मोठ्या माणसांच्या कार्याचे अवमूल्यन करण्याचा जसा प्रयत्न झाला तसाच खरे कृष्ण चरित्र लोकांपुढे येऊ देण्याचे षडयंत्र काही लोकांनी केल्याचे परखड मत महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी व्यक्त केले.राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील पुण्यतिथी व लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील जयंती निमित्ताने ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या संत तुकाराम गाथा पारायण व कीर्तन महोत्सव सॊहळ्याची सांगता महंत उद्धव महाराज मंडलिक,नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने शुक्रवारी झाली. यावेळी महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील,खा.डॉ.सुजय विखे पाटील,भाऊसाहेब विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.संत तुकाराम महाराजांच्या ' ये दशे चरित्र केले नारायणे ' या अभंगावर काल्याचे कीर्तन करताना उद्धव महाराज म्हणाले की,श्रीकृष्णाचे खरे चरित्र लोकांपुढे येऊ नये म्हणून फक्त खोड्या,चोऱ्या करणारा कृष्णच लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला.काही नाट्य कलावंत,कथा,कीर्तनकार त्यात पुढे होते.त्यामागे स्वतःच्या शृंगार भावनेला विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.मुळात श्रीकृष्णाच्या गोपिका भक्त होत्या.कृष्ण आठ वर्षांचा असेपर्यंतच तो गोपिकांसोबत होता.कृष्ण अवताराच्या बाबतीत हे मोठे षडयंत्र होते.मुळात या लोकांना कृष्ण समजलाच नाही.गीता सांगणारा,रणांगणावर मुत्सद्देगुरी करणारा,मोठमोठी संकटे सहज परतवून लावणारा,सामुदायिक समस्या अगदी सहजपणे सोडवणारा श्रीकृष्ण समाजापुढे या लोकांनी येऊ दिला नाही.अनंत गुणांचा समुच्चय,ज्ञानी,कलावंत,नेतृत्वगुण म्हणून कृष्ण किती मोठा आहे हे त्यांनी सांगितले नाही.वेगवेगळ्या वाङमयात गरजे पुरता कृष्ण मांडून समाजापुढे आणला.मात्र संतांनी समग्र श्रीकृष्ण सांगितला.उद्धव महाराज पुढे म्हणाले की,आत्मसंवादाने बुद्धीचा,मनाचा थकवा घालवता येतो.ऊर्जा निर्माण होते.जगातील मोठी झालेली माणसे अध्यात्म चिंतन करीत होती हे त्यांच्या आत्मचरित्रातून समोर आले आहे.छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.अब्दुल कलाम,पद्मश्री विखे पाटील,पद्मभूषण विखे पाटील ही माणसं अध्यात्म चिंतानातूनच मोठी झाली आहेत.ज्यांच्याकडे नेतृत्व गुण असतो त्यानी स्वतः लढण्याची गरज नसते.ते स्वतः एवढी मोठी माणसं विचारांच्या जोरावर निर्माण करतात.विज्ञान,तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी चांगले विचार टिकले नाही तर समाज टिकू शकणार नाही.आधुनिक प्रगती सदविचारांशीवाय कुचकामी ठरेल.यावेळी त्यांनी विखे कुटुंबाच्या राजकीय,सामाजिक व आध्यात्मिक कार्याचे कौतुक करताना त्यांच्या योगदानाची उदाहरणे दिली.सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार डॉ.जलाल महाराज सय्यद,श्रावण महाराज अहिरे,विश्वनाथ महाराज वारींगे,अशोक महाराज इलग शास्त्री,प्रा.नरेंद्र महाराज गुरव,ज्ञानेश्वर महाराज जळकीकर,ज्ञानेश्वर माऊली शिंदे,ऍड.शंकर महाराज शेवाळे यांची कीर्तने झाली. किसन महाराज पवार,विजय महाराज कुहिले,भारत महाराज धावणे यांनी गाथा पारायण नेतृत्व केले.विलास महाराज कोतकर,सुनील महाराज पारे, विराज महाराज मगर,रामचंद्र महाराज निंबाळकर,राहुल महाराज चेचरे,गोरक्ष महाराज देठे यांनी कीर्तन सेवेसाठी साथ-संगत केली.गाथा पारायणासाठी सुमारे सहाशे वाचक सहभागी झाले होते.वाचकांसाठी याच महिन्यात जगन्नाथ पुरी,गंगासागर आदी ठिकाणी तिर्थयात्रेचे अल्पदरात आयोजन करण्यात आले आहे.ग्रामस्थांनी नऊ दिवस दररोज किर्तनानंतर भोजन प्रसादासाठी योगदान दिले.परशुराम विखे,संजय म्हस्के,शिवाजी विखे यांच्यासह सप्ताह कमिटीने उत्तम नियोजनासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top