मोलमजुरी करणाऱ्या वडिलांनी बाळगलेली अपेक्षा पूर्ण करत मेहेकरीचे पाच तरुण पोलिस दलात.

Ahmednagar Breaking News
0

श्रीसदगुरू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेमुळे लाभले यश.

अहमदनगर, प्रतिनिधी.(18. मे ) : मोलमजुरी करणाऱ्या वडिलांनी बाळगलेली अपेक्षा पूर्ण करत जनतेच्या रक्षणासाठी अंगावर खाकी वर्दी घालायचीच, या ध्येयाने झपाटलेल्या मेहेकरी (ता. नगर) गावातील नितीन पोटे, ऋषिकेश पालवे, कल्पेश घाटविसावे, अक्षय निमसे आणि ईश्वर पोटे या पाच तरुणांनी पोलीस दलात दाखल होऊन  इतरांसाठी आदर्श घालून दिला. स्नेहालय संस्थेने मेहेकरी गावात वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या श्रीसदगुरू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेमुळे या तरूणांना हे यश लाभले.

पोलिस आणि सैन्यदलात भरती होण्यासाठी लाखो मुले-मुली तयारी करत असतात. खूप परिश्रम घेऊनही मोजकेच यशस्वी होतात. मेहकरीतील निवड झालेले पाच युवक आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही मागील सहा वर्षांपासून पोलीस दलात भरती होण्यासाठी खूप कष्ट करत होते, परंतु त्यांना यश प्राप्त होत नव्हते.  श्रीसदगुरू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेमुळे ते यंदा यशस्वी झाले.

मेहेकरी हे ऐतिहासिक गाव आहे. गावात सद्गुरु महाराजांचा मठ आहे. तथापि, स्पर्धा परीक्षा किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या परीक्षा देण्याकरिता गावात सार्वजनिक वाचनालय किंवा अभ्यासिका नसल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडायची. त्यांना दररोज १५ किलोमीटर अंतरावरच्या अहमदनगर शहरात यावे लागत असे. 

या मुलांची अडचण लक्षात येताच स्नेहालय संस्थेच्या युवा निर्माण प्रकल्पामार्फत मेहेकरी गावात श्रीसदगुरू सेवा प्रेरणा केंद्र वर्षापूर्वी सुरू करण्यात आलं.

युवकांमध्ये समाजकार्याची आवड निर्माण व्हावी, तसेच स्पर्धा परीक्षा देऊन तरूण-तरूणींनी शासकीय अधिकारी व्हावे, या दृष्टिकोनातून स्नेहालयाने ग्रामीण भागात सार्वजनिक वाचनालयं आणि अभ्यासिका सुरू केल्या आहेत.  मेहेकरी गावातील तरुणांची संघर्ष करण्याची आणि जिद्द पाहून स्नेहालयने मदतीचा हात पुढे केला.

स्नेहालय संचलित सद्गुरू सेवा प्रेरणा केंद्रामुळे मेहकरी गावातील विद्यार्थ्यांचा नगरला येण्या-जाण्याचा वेळ वाचला. त्यांना गावातच योग्य मार्गदर्शन मिळू लागलं. सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध झाली. या अभ्यासिकेत रात्रं-दिवस अभ्यास करून गावातील पाच तरुणांनी  घवघवीत यश मिळवले. मुंबई जिल्हा पोलिस दलात हवालदारपदी त्यांची निवड झाली आहे. 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top