येणारा काळ हा भारताच्या उज्वल भविष्याचा आहे. - मंत्री ना. दीपक केसरकर.

Ahmednagar Breaking News
0

येणारा काळ हा भारताच्या उज्वल भविष्याचा आहे. - मंत्री ना. दीपक केसरकर.

लोणी, प्रतिनिधी. (05. मे.) : जगाचे नेतृत्‍व करण्‍याची क्षमता देशातील युवकांमध्‍ये निर्माण करण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेली सर्व स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी भारतीय संस्‍कृतीचे मोठेपण शिक्षण क्षेत्रातही टिकविण्‍याचा प्रयत्‍न सर्वांना करावा लागेल अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री ना.दीपक केसरकर यांनी व्‍यक्‍त   केली.  

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचा ४३ वा स्‍मृतीदिन आणि  लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचा ९१ व्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधून लोणी बुद्रुक ग्रामस्‍थांच्‍या  वतीने आयोजित केलेल्‍या अखड हरिणाम सप्‍ताहाची सांगता आणि अभिवादन सोहळा मंत्री दीपक केसरकर यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाला. तत्‍पूर्वी लोणी खुर्द येथील बीओटी तत्‍वावर बांधण्‍यात आलेल्‍या जिल्‍हा परिषद शाळा इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि लोणी बुद्रुक येथील भव्‍य व्‍यापारी संकुलाचे उद्घाटन त्‍यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न  झालेल्‍या या कार्यक्रमास ह.भ.प उध्‍दव महाराज मंडलिक, महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम, बाळासाहेब मुरकूटे, जिल्‍हाधिकारी सिध्‍दराम सालिमठ, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य  कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, जिल्‍हा सहकारी बॅंकेचे संचालक आंबादास पिसाळ, भाऊसाहेब विखे, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, जिल्‍हा परिषदेच्‍या  माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्‍यासह जिल्‍ह्यातील अनेक मान्‍यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. मोफत अपघात विमा योजनेतील ७ कुटुंबाना मंजुर झालेल्‍या विमा रकमेचे धनादेश मंत्री दीपक केसरकर यांच्‍या हस्‍ते सुपूर्त करण्‍यात आले.

आपल्‍या भाषणात मंत्री ना.दीपक केसरकर म्‍हणाले की, शिक्षण विभागाचा मंत्री असणे म्‍हणजे एक पिढी घडविण्‍याची जबाबदारी असते, राज्‍यात आज ७५ हजार शाळा या जिल्‍हा परिषदेच्‍या आहेत. या शाळांच्‍या इमारतींचा विकास करताना शालेय शिक्षणाचा पाया सुध्‍दा   भक्‍कम करण्‍याची जबाबदारी ही मोठी आहे. त्‍यामुळे नगर जिल्‍ह्याने बीओटी तत्‍वावर जिल्‍हा परिषद शाळांचा विकास करण्‍यासाठी जो पॅटर्न राज्‍याला दिला त्‍याचे कौतूक करुन, त्‍यांनी सांगितले की, या परिसराने नेहमीच काहीतरी शिकण्‍याची संधी दिली. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य मर्यादीत नाही. त्‍याच पध्‍दतीने पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी पाणी आणि आरोग्‍य क्षेत्रात केलेले काम हे खुप व्‍यापक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात तांत्रिक शिक्षणाला असलेले महत्‍व हे पद्मभूषण डॉ.विखे पाटील यांनी खुप वर्षापुर्वीच ओळखले होते. त्‍याचा अंतर्भाव आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्‍या शिक्षण धोरणात केला आहे. त्‍यामुळेच शहरी भागातील विद्यार्थ्‍यांना मिळणा-या सर्व सुविधा येणा-या शैक्षणिक वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांनाही देण्‍याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामध्‍ये नर्सरी आणि केजीचाही समावेश राहील असे स्पष्‍ट करुन मंत्री दीपक केसरकर म्‍हणाले की, एवढ्यावरच थांबुन चालणार नाही तर आता शालेय शिक्षणात कृषि अ‍भ्‍यासक्रमाचा समावेशही करण्‍याचा निर्णय आम्‍ही घेतला आहे. शेती क्षेत्रात असलेले महत्‍व, शेतक-यांचे दु:ख हे नव्‍या पिढीलाही समजले पाहीजे हाच दृष्‍ट्रीकोन यामागे आहे.

भारत देश हा वेगवेगळ्या क्षेत्रात आवश्‍यक असलेले मनुष्‍यबळ निर्माण करीत आहे. हे मनुष्‍यबळ जगालाही पुरविण्‍याची क्षमता आता देशामध्‍ये आहे. कारण ब-याच कालखंडानंतर जगाचे नेतृत्‍व करण्‍याची संधी भारताला आली आहे. त्‍यामुळेच शालेय अ‍भ्‍यासक्रमाच्‍या पलिकडे जावून भारतीय संस्‍कृती आणि इतिहासाचे स्‍मरण भविष्‍यातील पिढीला करुन देण्‍यासाठी शिक्षण क्षेत्रातही याचे मोठेपण टिकविण्‍याची जबाबदारी आम्‍हाला घ्‍यावी लागेल असे सुचित करुन मंत्री दीपक केसरकर म्‍हणाले की, शेवटी आमच्‍या समाज व्‍यवस्‍थेचा पाया हा अध्‍यात्‍मावर आधारित आहे. राजकारणात काम करतानाही विखे पाटील कुटुंबियांनी हा अध्‍यात्मिक वारसा अशा सप्‍ताहाच्‍या माध्‍यमातून जपला, आपल्‍या  दैवतांची आठवण दिल्‍लीमध्‍ये सुध्‍दा ठेवणारे पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील हे एकमेव होते. त्‍यामुळेच  संत तुकारामांचे नाणे प्रकाशित होवू शकले अशी आवठणही त्‍यांनी काढली.आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी लोणी बुद्रुक ग्रामस्‍थांनी या सप्‍ताहाच्‍या माध्‍यमातून जोपासलेला अध्‍यात्मिक वारसा म्‍हणजे पद्मश्री विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या   संस्‍कारांचा भाग असल्‍याचे सांगून या परिसराने सर्व क्षेत्रात यशस्वीपणे काम केले आहे. ग्रामीण शिक्षणाचा पाया मजबुत करताना जिल्‍हा परिषद शाळेचा बीओटी तत्‍वाने विकास करण्‍याचा नवा मापदंड घालून दिला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.


 



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top