विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नामांकित व्यक्तींना पृथ्वी फाउंडेशनचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.
नगर, प्रतिनिधी. (24. मे.) : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या नामांकित व्यक्तींना यावर्षीपासून पृथ्वी फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येत आहेत. शुक्रवार दि. 26 मे रोजी सकाळी अकरा वाजता नगरमधील माऊली संकुल येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे. तसेच, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले महारुद्र जगन्नाथ भोर यांचाही विषेश सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती पृथ्वी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. अमोल सायंबर यांनी दिली
पृथ्वी फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून अहमदनगर व बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवित आहे. पृथ्वी फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित गौरव करावा, असा मनोदय विश्वस्तांनी व्यक्त केला होता. त्यानुसार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रा. डॉ सज्जन गायकवाड, डॉ नारायण गवळी व श्री हरिश्चंद्र दळवी सर यांना राष्ट्रीय निर्माता पुरस्कार देण्यात येत आहे. जलसंधारण व पर्यावरण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल मा. डॉ रामकृष्ण बोडके यांना पर्यावरण मित्र पुरस्कार देण्यात येत आहे. दैनिक पुढारीचे उपसंपादक डॉ. सूर्यकांत वरकड यांना शोध पत्रकारिता पुरस्कार देऊन व कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री समाधान सोळंके यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव प्रकल्प व कार्य समितीचे प्रमुख पोपटराव पवार, माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक लोक आवाजचे संपादक विठ्ठल लांडगे असतील.
दरम्यान, यूपीएससी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेले महारुद्र जगन्नाथ भोर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच, पृथ्वी फाउंडेशन संचलित मास्टर माईंड अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेऊन पोलीस दलामध्ये भरती झालेल्या सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. अमोल सायंबर, सचिव सिद्धनाथ मेटे महाराज यांनी केले आहे.