सक्षम व सुदृढ समाज निर्मितीसाठी मोफत शिबीर काळाची गरज. - पो.नि. राजेंद्र सानप.

Ahmednagar Breaking News
0

 बोल्हेगांव येथ मोफत आरोग्य शिबीर संपन्न.


नगर, प्रतिनिधी. (05. मे.) : आज अनेक आजार बळावत आहेत, त्यावर उपचार करण्यासाठी सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत मोफत शिबीराच्या माध्यमातून मानवतेचे मोठे काम होत आहे. अशा शिबीरांचा गोर-गरीबांना मोठा आधार मिळत आहे. समाजातील दु:ख कमी करण्याचे काम या सामाजिक संस्था करत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. अशा शिबीरासाठी इतरांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे गरजूंवर उपचार होऊन त्यांचे दु:ख नाहिसे होईल. आज वयाच्या प्रत्येक टप्प्यावर नेत्र विकार जडत आहे. वेळेच उपचार झाल्यास आपली दृष्टी चांगली राहण्यास नक्कीच मदत होईल. मोफत शिबीराच्या माध्यमातून ही संधी आयोजकांना उपलब्ध करुन दिली आहे. ओम शिव गोरक्षनाथ सेवाभावी संस्था व फिनिक्स फौंडेशनने मोफत शिबीर आयोजित केले हे कौतुकास्पद आहे. धार्मिक कार्याला सामाजिकतेची जोड देऊन एक सक्षम व सुदृढ समाज निर्माण करण्याचे काम अशा शिबीरातून होत आहे, असे प्रतिपादन एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. राजेंद्र सानप यांनी केले.

बोल्हेगांव, एमआयडीसी येथील ओम शिव गोरक्षनाथ योगी सेवा भावी संस्था व फिनिक्स फौंडेशनच्यावतीने मोफत आरोग्य व  नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. राजेंद्र सानप, गुरुवर्य अशोक महाराज पालवे, किसन भिंगारदिवे, फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, संजय आव्हाड, विष्णू होळकर, संभाजी शिंदे, गौरव चौधरी, संभाजी शिंदे, अवि कोतकर, शिवाजी बोरुडे आदि उपस्थित होते.

यावेळी गुरुवर्य अशोक महाराज पालवे म्हणाले, भगवंतांला अभिप्रेत असेच कार्य प्रत्येकाच्या हातून होणे अपेक्षित आहे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. मानवाचे दु:ख नाहिसे करण्यासाठी परमेश्वराच्या नामाबरोबर त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. याच भावनेतून या मोफत नेत्र तपासणी शिबीराच्या माध्यमातून मानव सेवा घडत आहे. यापुढे हृदयरोग व कॅन्सर रुग्णांसाठी मोफत शिबीर आयोजित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी फिनिक्सचे जालिंदर बोरुडे म्हणाले, फिनिक्स फौंडेशन आणि सामाजिक संस्थांच्या सहाय्याने मोफत आरोग्य सेवेच्या माध्यमातून गोर-गरीबांची सेवा केली जात आहे. या कार्यात अनेकांचा सहभाग मिळत असल्याने हे कार्य दिवसेंदिवस व्यापक होत चालले आहे. नेत्र शिबीराच्या माध्यमातून अनेक गरजूंवर उपचार करुन त्यांना दृष्टी देण्याचे काम फिनिक्सच्या माध्यमातून सुरु असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किसन भिंगारदिवे यांनी केले तर आभार संजय आव्हाड यांनी मानले. राजू भिंगारदिवे, तानाजी शिंदे, दिपक लटके, अर्जुन गेरंगे, गोरख निकम, रामा कोतकर, अशोक आचार्य आदिंसह नाथ भक्तांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या शिबीरातील रुग्णांची तपासणी स्नेहालय हॉस्पिटलच्या डॉ.अर्चना लांडे व त्यांच्या टिमने केली. या शिबीरात 147 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येऊन अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. 37 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात आली.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top