पुण्य तुमच्या नशिबी आले नाही यात आमचा काय दोष ? - नामदार विखे पाटील.
संगमनेर,प्रतिनिधी. (28. मे.) : पुण्याचे काम करायला भाग्य लागते, ते तुमच्या नशिबी आले नाही यात आमचा काय दोषॽ पुण्याचे काम आमच्या हातूनच व्हायचे होते असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांना लगावला.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज निळवंडे धरणाच्या मुखापासून कालव्यांची पाहाणी केली. संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा पासून ते गुंजाळवाडी पर्यंत सुरू असलेल्या कालव्याच्या कामाचा आढावा घेत त्यांनी या भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले.याप्रसंगी माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतिक्षा आता संपत आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता करून पाण्याची चाचणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि.३१ मे २०२३ रोजी होत असल्याची बाब सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने निळवंडे प्रश्नावरून कोण काय म्हणतो याकडे लक्ष देत नाही. या प्रकल्पावरून झालेले रणकंदन अनेक वर्षे सर्वांनी अनुभवले याकडे लक्ष वेधत, राज्यात ज्या पक्षाचे सरकार होते त्यांनी या प्रकल्पासाठी निर्णय केले त्यामुळे प्रकल्प मार्गी लागतोय.
आरोप होत राहातात. कालपर्यत वाळू अभावी कालव्यांची काम ठप्प असल्याचे वक्तव्य करणा-यांना कालव्यातून पाणी सोडावे म्हणून मागणी करण्याची उपरती झाली. पण कालव्यांच्या कामाची सुरूवात धरणाच्या मुखापासून युती सरकारच्या काळात सुरू झाली आणि युती सरकारच आता पाणी देणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आता पुण्यांचे काम करायला भाग्य लागते. तुमच्या पदरी ते आले नाही यात आमचा काय दोष असा सवाल करतानाच हे पुण्याचे काम आमच्या हातूनच व्हायचे होते असा सणसणीत टोलाही मंत्री विखे पाटील यांनी थोरातांचे नाव न घेता लगावला. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात नवा आशय या कामामुळे निर्माण होत आहे. खुल्या अंतकरणाने याकडे आता पाहीले पाहीजे यानिमित्ताने शेतक-यांच्या जीवनात निर्माण होणाऱ्या आनंदात सहभागी होण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर मंत्री विखे पाटील यांनी अधिका-यांना तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले. याप्रसंगी माजी आ.वैभव पिचड, बापुसाहेब गुळवे, भाजपाचे तालुका अध्यक्ष सतिष कानवडे,शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, भीमराज चत्तर, रविंद्र थोरात जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, प्रांताधिकारी हिंगे, जलसपंदा विभागाचे अरूण नाईक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.