स्नेहालय विद्यालयाने उभारला शिक्षणाचा दीपस्तंभ.- ना.दीपक केसरकर.
अहमदनगर, प्रतिनिधी.(17.जून.) : स्नेहालय संस्थेच्या इंग्रजी माध्यम विद्यालयाची जगातील पहिल्या दहा सर्वोत्तम संस्थांच्या श्रेणीत निवड आज घोषित झाली .स्नेहालय विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेल्या प्रेरक दीपस्तंभामुळे महाराष्ट्राची भारतात आणि भारताची संपूर्ण विश्वात मान उंचावली असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केले.
इंग्लंड मधील "T4 एज्यूकेशन", ही संशोधन संस्था आणि सहयोगी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सर्वेक्षणातून दरवर्षी वंचितांच्या शिक्षणात प्रेरक काम करणाऱ्या 10 सर्वोत्तम संस्था निवडल्या जातात.आज सकाळी या निवडीची अधिकृत घोषणा शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागातर्फे केली. स्नेहालय पुनर्वसन संकुलात यानिमित्ताने आयोजिण्यात आलेल्या जल्लोशात ना.केसरकर मुंबई येथून ऑनलाईन सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण क्रांती घडवणाऱ्या विनोबा ॲपचे संस्थापक संजय दालमिया होते. शाळेचे संचालक राजेंद्र शुक्रे, हनीफ शेख ,प्रमुख मार्गदर्शक मिलिंद एकनाथ कुलकर्णी आणि संगणकतज्ञ अजित थदानी, बालकल्याण समितीच्या सदस्या अनुराधा येवले आणि रोहिणी कोळपकर, मुख्याध्यापिका क्षितिजा हडप आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
ना.केसरकर पुढे म्हणाले की , शिक्षणाचे व्यापक सामाजिकीकरण आणि प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी वंचित समुहातील विद्यार्थ्यांना स्नेहालयाने दर्जेदार शिक्षण दिले.त्यामुळे ही निवड करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक ,संचालक यांच्या सामूहिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तसेच शिक्षकांमधील समवेदनेमुळे ही निवड झाली असे शिक्षणमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात, सप्टेंबर महिन्यात जगातील पहिल्या क्रमांकाची शाळा असा लौकिक स्नेहालयची शाळा मिळवेल, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला.