सततच्‍या पावसाने नुकसान झालेल्‍या पिकांची भरपाई या आठवड्यातच शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग होईल.- ना. राधाकृष्ण विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

सततच्‍या पावसाने नुकसान झालेल्‍या पिकांची भरपाई या आठवड्यातच शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग होईल.- ना. राधाकृष्ण विखे पाटील.

राहाता,प्रतिनिधि. (02. जून.) : राज्‍यात जनतेच्‍या मनातील सरकार असल्‍यामुळेच लोकांच्‍या हिताचे निर्णय होत आहेत. सर्व समाज घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु आहे. सततच्‍या पावसाने नुकसान झालेल्‍या पिकांची भरपाई या आठवड्यातच शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग होईल अशी ग्‍वाही  महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध  व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी शेतक-यांशी संवाद साधतांना दिली.

मंत्री विखे पाटील यांनी वाकडी आणि पंचक्रोशित बैठकांचे आयोजन करुन, नागरीकांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. शासन आपल्‍या दारी या उपक्रमाचा आढावाही त्‍यांनी आधिका-यांकडून घेतला. या उपक्रमाच्‍या  माध्‍यमातून शासन योजनांची अंमलबजावणी अधि‍क प्रभावीपणे करण्‍याचे आदेश त्‍यांनी आधिका-यांना दिले. वाड्या वस्‍त्‍यांवरील रस्‍त्‍यांच्‍या  समस्‍यांबाबतही त्‍यांनी उपस्थित आधिका-यांना महत्‍वपूर्ण सुचना देवून काही रस्‍त्‍यांसाठी उपलब्‍ध झालेल्‍या निधीची माहीती ग्रामस्‍थांना दिली.विज वितरण कंपनीच्‍या बाबतीत भेडसावणा-या समस्‍यांबाबत त्‍यांनी आधिका-यांना तातडीने जिल्‍हा विकास नि‍योजन समितीकडे प्रस्‍ताव पाठविण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. ट्रान्‍सफॉर्मर उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने निधी उपलब्‍ध करुन देण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

तहसिल कार्यालयातून आवश्‍यक असलेल्‍या दाखल्‍याची समस्‍या दुर करण्‍यासाठी याच महिन्‍यात एका अर्जावर अनेक दाखले उपलब्‍ध करुन देण्‍याची योजना कार्यान्वित करण्‍याच्‍या दृष्‍टीने आपला प्रयत्‍न आहे. जमीनींच्‍या मोजणीबाबतचे बहुतांशी प्रकरण आता निकाली निघत असून, रोवर तंत्रज्ञानाची मोठी मदत यासाठी झाली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. जिल्‍ह्यामध्‍ये सुरु झालेल्‍या शासनाच्‍या वाळू विक्री केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळत असून, ६०० रुपये दराने वाळू उपलब्‍ध करुन देण्‍याचा ऐतिहासिक निर्णय ठरला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सततच्‍या पावसामुळे नुकसान झालेल्‍या शेती पिकांची नुकसान भरपाई शेतक-यांना अद्याप मिळालेली नाही. त्‍याचे गांभिर्य सरकारला निश्चित असून, याच आठवड्यात ही मदत शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग केली जाणार आहे. पिक विमा योजनेबाबत आता शेतक-यांनी कोणतीही चिंता करण्‍याचे कारण नाही. आता सरकारनेच तुमच्‍या पिकाचा १ रुपयात विमा उतरविण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याने या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल असा विश्‍वास मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top