अहमदनगर जिल्हा बँकेची मोबाईल बँकिंग ॲप सेवा सुरू.- पालकमंत्री विखे पाटील.

Ahmednagar Breaking News
0

आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत जिल्हा बँकेचे एक पाऊल पुढे. - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

अहमदनगर,प्रतिनिधी. (15. जून.) अहमदनगर जिल्हा बँकेने मोबाईल बँकिंग ॲप सेवा सुरू करून बँकिंग स्पर्धेच्या युगात एक पुढचे पाऊल टाकले असून शेतकऱ्यास अधिकाधिक सुविधा  देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. ते जिल्हा बँकेच्या मोबाईल ॲप उद्घाटन समारंभात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर खा.डॉ.सुजय विखे पाटील, आ.मोनिका राजळे, बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार राहुल जगताप,बँकेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी रावसाहेब वर्पे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना नामदार विखे पाटील म्हणाले की आशिया खंडात आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पहिली असून राज्यात ज्या काही चार पाच सुस्थिती मध्ये असलेल्या बँकेत एक नंबरची बँक असा नाव लौकीक आहे. या बँकेने शेतकरी,कारखानदार तसेच महिला बचत गटांना गरजेच्या वेळी कर्जाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली आहे. ही बँक यावरच थांबली नसून इतर बँकेच्या स्पर्धेत स्वतः च असित्व टिकवत किंबहुना अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे.सहकार चळवळीचा मोठा वारसा लाभलेल्या या बँकेच्या संचालक मंडळाने राजकीय विचार बाजूला ठेवत कायम शेतकऱ्यांचा हिताला प्राधान्य दिले आहे असे सांगून यामुळेच आज बँकेची वाटचाल ही भरभराटीकडे जात आहे.येणाऱ्या काळात महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर पत पुरवठा केला पाहिजे अशी सूचना राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून मोबाईल बँकिंग ॲप मुळे दैंनदिन कामकाज हे सुलभ होईल असे सांगितले. या बँकेच्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी तसेच सर्वसामान्यांचा विकास करण्यासाठी येणाऱ्या काळात शासनस्तरावर अथवा वैयक्तिक पातळीवर जे जे काही सहकार्य लागेल ते करण्यासाठी आपण तयार असल्याचे यावेळी त्यांनी आश्वासन दिले. बँकेचा हा वाढता आलेख असाच उत्तोरोतर वाढत जावो अशा शुभेच्छा शेवटी त्यांनी दिल्या.बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या भाषणातून बँकेचा आढावा सांगताना बँकेच्या ठेवी ह्या आठ हजार५५५ कोटीच्या असल्याचे सांगून ११ हजार८६१ कोटी रुपयांचे खेळते भांडवल असल्याचे सांगितले. बँकेचा एनपीए चे प्रमाण४.५३% इतके आहे. 

२८७ शाखा तर ११ विस्तार कक्षाद्वारे बँक ही सेवा देते हे सांगताना कर्डिले यांनी बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मोबाईल बँकिंगॲप सुरू केले असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची बँक अधिकाधिक सक्षम होण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या मदतीची गरज असून यासाठी केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे निश्चित मदत करेल असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी प्रास्ताविक केले.या समारंभात महिला बचत गटांना कर्जाचे धनादेश वाटप करण्यात आले. समारंभास संचालक, शेतकरी सभासद, पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top