महर्षी ग. ज. चितांबर विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव आणि पाठ्यपुस्तक वितरण समारंभ संपन्न.
नगर, प्रतिनिधी. (16. जून.) : येथील नव विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी ग. ज. चितांबर विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि शालेय पाठ्यपुस्तक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. रांगोळी, स्वागत कमान आणि फुग्यांच्या सजावटीने सुशोभित विद्यालयात नवीन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके, गुलाबपुष्प आणि खाऊ वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी स्नेहालय संचालित उडान आणि संजय नगर पुनर्वसन प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक मा. श्री. प्रवीण कदम अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी विद्यार्थ्यांना आपले जीवनध्येय निश्चित करण्याचे आवाहन केले आणि ध्येय साध्य करण्यासाठी अपरिमित मेहनत करण्याची प्रेरणा दिली. त्याचबरोबर विद्यार्थी जीवनात वाईट गोष्टी आणि समाजविघातक घटकांपासून स्वतःला वाचवण्याचे अनेक उपाय त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. बालकांची तस्करी कशाप्रकारे होते, मुलींना कशाप्रकारे फुस लावले जाते, बालविवाह सारखे कृपया कितपट वाईट आहे. बालविवाह झाल्यानंतरचे कोणते दुष्परिणाम होतात. या विषयी सविस्तर मार्गदर्शन सुद्धा यांनी केले.यावेळी व्यासपीठावर स्नेहालय कॅरिंग फ्रेंड हॉस्पिटलचे श्री विजय कदम, मुख्याध्यापिका सौ. विभावरी रोकडे, पर्यवेक्षिका श्रीमती मंदा शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सौ.विभावरी रोकडे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले. श्री प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर श्री गणेश उघडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सोपान शिंदे, श्री. अरुण इघे, श्री वैभव सांगळे यांनी प्रयत्न केले.