बूथ कमिटी सक्षम झाली तरच सर्व निवडणुका मध्ये विजय निश्चित.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.
अहमदनगर (प्रतिनिधी. (26. जून.) : निवडणुका मध्ये बूथ कमिटी हे बलस्थान असून बूथ कमिटी सक्षम करणे गरजेचे आहे, कमिटी सक्षम झाली की निवडणुकीत शंभर टक्के विजय मिळतोच असे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.भाजप संयुक्त मोर्चा संमेलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पक्ष निरीक्षक उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. व्यासपीठावर आमदार श्रीमती मोनिका राजळे, डीसिसी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहराध्यक्ष महेन्द्र गंधे, जिल्हा प्रभारी भानुदास पडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना विखे म्हणाले की, मोदी @9 या भाजपाच्या एक महिन्या जनसंपर्क अभियानाच्या काळात पक्षाने दिलेले सर्व जन संपर्काचे कार्यक्रम यशस्वी पार पडले आहेत, या कार्यक्रमात सर्वसामान्य नागरिकांनी देखील उस्फूर्त सहभाग घेतला. या विविध कार्यक्रमातून जन संपर्का बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले कार्य, गरीब कल्याणकारी योजना या बाबत जनतेत जनजागृती केली. येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करावयाचे असून या साठी गाव पातळी पासून जनजागृती करणे सुरू आहे. परंतु या बरोबरच प्रत्येक बूथ कमिटी देखील सक्षम करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले. त्यासाठी ही कमिटी सक्षम करण्यासाठी पक्षीय पातळीवर प्रयत्न करणे सुरू आहेत. याच बरोबर बूथ कमिटी मध्ये 18 ते 25 वयोगटातील तरुणांना काम करण्याची संधी दिली तर बूथ कमिटी जोमाने आणि उत्साहाने काम करेल यात शंकाच नाही. एवढंच नाही तर निवडणुकीत विजय देखील निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तीरथ सिंह रावत यांनी आपल्या भाषणातून सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील नऊ वर्षात देशच नव्हे तर जगात आपला ठसा उमटवला आहे. 1947 देश स्वतंत्र झाला मात्र नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक,संस्कृती आघाडीवर स्वतंत्र झाला असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. येणाऱ्या काळात भारत देश हा महासत्ता नक्की होईल अशी आशा असून विरोधक कितीही एकत्र आले तरी पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार आहेत. हे सर्व सत्य असले तरी हे प्रत्यक्षात आणण्यासाठी बूथ कमिटी पासून आपल्या तयारी करावयाची आहे आणि यासाठी आपण लगेच कामाला लागले पाहिजे असे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले.या संमेलनासाठी अहमदनगर जिल्ह्यातील बूथ कमिटी सदस्य, तालुकाध्यक्ष ,विविध मोर्चाचे अध्यक्ष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.