राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरातील वीज पुरवठा अखंडित राहण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची विद्युत विभागाकडे निवेदनातून मागणी.
अहमदनगर, प्रतिनिधी. (27. जून.) : शहरामध्ये सध्या वारंवार वीज पुरवठा कोणत्याही पध्दतीचे भारनियमन नसताना कोणतीही पूर्वसूचना न देता, नेहमीच वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत, शहरातील छोटया-मोठया व्यवसायिकांचे या खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. आधीच वातावरणामध्ये सध्या प्रचंड उकाडा होत आहे त्यातच रात्रीच्या वेळीही अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढण्याची वेळ येत आहे. यात आता शाळा महाविद्यालय सुरु झाल्यामुळे या खंडीत वीज पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेषतः सायंकाळी रात्री वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे, रात्रीच्या वेळी अंधराचा फायदा घेऊन घरफोडी व दरोडा अशा घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही, थोडा पाऊस चालू झाला तरी सुध्दा वीज पुरवठा खंडित केला जातो. याचाच अर्थ मान्सून पूर्व कोणतीही पूर्वतयारी आपल्या विभागाच्या मार्फत करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे, यावरून आपल्या कार्यपध्दतीबाबत उदासिनता दिसून येत आहे. तसेच नागरिकांनी फोन लावल्यानंतर फोन उचलला जात नाही,कार्यालयाकडून तक्रारीचे निराकरण तातडीने होत नाही, विद्युत विभागाचे नंबर नागरिकांना माहित व्हावे यासाठी ते जाहीर करण्यात यावे, शहरातील विद्युत पोल, विद्युत तारा याठिकाणी लोंबकळत असलेली झाडेझुडपे काढून टाकणे गरजेचे आहे, सर्व उपाययोजना करून अहमदनगर शहरातील वेळोवेळी खंडीत होणारा वीज पुरवठा सुरळीत करा.तसेच पुढील काळात अहमदनगर शहरामध्ये वीज पुरवठा खंडीत होणार नाही यास तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी विद्युत विभागाकडे निवेदनातून केली.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, संतोष लांडे, जॉय लोखंडे, नितीन लिगडे, संभाजी पवार, सोमनाथ तांबे, माऊली जाधव, सतीश ढवन, गौरव बोरुडे, गणेश बोरुडे, संजय सपकाळ, वैभव वाघ, राम वाघ आदी उपस्थित होते.विद्युत विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन शिष्ठ मंडळाला देण्यात आले.