सामाजिक कार्यातील जालिंदर बोरुडे यांचा सहभाग कौतुकास्पद.- आ.संग्राम जगताप.
नगर, प्रतिनिधी.(28. जून.) : नोकरी, व्यवसाय सांभाळतांना अनेकजण हा स्वत:चा विचार करतात. निवृत्तीनंतर आरामशीर जीवन व्यतित करण्याचा विचार करतात. परंतु जालिंदर बोरुडे यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते हे नेहमीच दुसर्यांचा विचार करुऩ काम करतात. पाटबंधारे विभागात प्रामाणिकपणे नोकरी करत असतांना सहकार्यांना नेहमीच मदतीचा हात दिला आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यातील त्यांचा सहभाग हा कौतुकास्पद असाच आहे. मोफत आरोग्य शिबीराच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून अनेकांना दृष्टी देण्याचे काम केले आहे. आता निवृत्तीनंतरही त्यांचे हे सामाजिक काम अधिक व्यापक होईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.पाटबंधारे विभागातील जालिंदर बोरुडे यांचा सेवानिवृत्तीबद्दल आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कर करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी अभिजित खोसे, नगरसेवक अजिंक्य बोरकर, उद्योजक योगेश ठुबे, इंजि.मंगेश दरवडे, ग्रा.पं.सदस्य बाबासाहेब धिवर आदि उपस्थित होते.याप्रसंगी अजिंक्य बोरकर म्हणाले, जालिंदर बोरुडे हे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, समाजसेवेचे घेतलेले व्रत त्यांनी नेहमीच अंगिकारले. नोकरी सांभाळून ते हे कार्य करत. त्यांची नोकरीतून निवृत्ती झाली असली तरी सामाजिक कार्यात यापुढे जोमाने काम करत राहतील, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी अभिजित खोसे, योगेश ठुबे यांनीही मनोगतातून जालिंदर बोरुडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. जालिंदर बोरुडे यांनीही सर्वांच्या सहकार्याने यापुढे आपले कार्य असेच सुरु राहील, असे सांगितले.मगेश दरवडे यांनी सूत्रसंचालन केले तर बाबासाहेब धिवर यांनी सर्वांचे आभार मानले.