शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला,उडान टीम आणि शेवगाव पोलीस स्टेशननी दाखवली समयसूचकता.
अहमदनगर,प्रतिनिधी. (17.जून.) : पाथर्डी तालुक्यातील जाट देवळे या गावातील राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे लग्न लावून देण्यात येत असल्याची माहिती निनावी फोनद्वारे उडान टीम आणि चाईल्ड लाईन हेल्पलाईनला मिळताच त्यांनी तत्काळ शेवगाव पोलीस स्टेशनशी समन्वय साधून हा बालविवाह रोखला. शुक्रवारी सकाळी १२ :३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. मुलीसह तिचे आई-वडील, नवरदेव मुलगा व त्यांचे आई वडील, नातेवाइकांना ठाण्यात बोलावून हा गुन्हा असल्याचे समजावून सांगितले. तसेच मुलगी सज्ञान होईपर्यंत तिचा विवाह करणार नाही, असे त्यांच्याकडून लिहून घेतले. या १७ वर्षीय मुलीचा या लग्नाला विरोध असताना तिचे आई-वडील बळजबरीने लग्न लावून देत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
असा घडला प्रकार.
जाट देवळा येथील मुलाशी साखरपुडा आणि लग्न करण्याचा कार्यक्रम शेवगाव तालुक्यातील हादगाव या गावातील नवरदेव मुलाचा नातेवाईकांचा दरात असल्याचे उडान टीम आणि चाईल्ड लाईन ला समजले. हा बालविवाह रोखण्यासाठी उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानाचे समन्वयक, श्री. प्रवीण कदम आणि चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक श्री. महेश सूर्यवंशी यांनी शेवगाव पोलीस स्टेशन शी संपर्क साधत बालविवाह संबंधित सविस्तर माहिती दिली. माहिती मिळताच कोणताही विलंब न करता पोलीस निरीक्षक श्री. विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. के. धोत्रे आणि त्यांचे पथक मिळून बालविवाह रोखण्यासाठी घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली.
पालकांना नोटीस.
पोलिसांनी मुलीसह आई-वडील नातेवाइकांना पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्यांचे समुपदेशन करून मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करू नये, अशी नोटीस बजावली. त्याचबरोबर उडान टीम ने शेवगाव तालुक्यातील हात गाव, मगलुर गाव आणि पाथर्डी तालुक्यातील जाट देवळा या तिन्ही ग्रामसेवकांसोबत समन्वय साधून सदर बालविवाह विषयक माहिती देऊन, सदर बालविवाह प्रकरण बाल कल्याण समिती समोर सादर करावे यासाठी मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले आहे.