नगर जिल्ह्यातील रस्ते विकास कामांना तत्वत: मंजूरी. - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकित निर्णय.
मुंबई,प्रतिनिधी.(26.सप्टेंबर.2023.) : अहमदनगर जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने रस्ते विषयक विविध मागण्यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तत्वत: मंजूरी दिली आहे. अहमदनगर-मनमाड रस्त्यादरम्यानच्या डी.एस.पी. चौक आणि एम आय.डी.सी. येथे दोन उड्डाणपुल तथा भुयारीमार्ग बांधणे, शेवगांव येथे बाह्यवळण रस्त्याचे काम करणे, तसेच अहमदनगर शहरातील डी.एस.पी. चौक येथील शासकीय निवासस्थाने ‘बांधा, वापरा, हस्तांतरण करा’ या तत्वावर विकसित करण्याबाबतच्या मागण्यांचा यात समावेश असल्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्हयातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने आज मुंबई मंत्रालय येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील, रस्ते विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, बांधकामे विभागाचे सचिव संजय दशपुते यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.अहमदनगर जिल्हयातील सद्यस्थिती लक्षात घेता येत्या काळात वाहतुकीचे सुनियोजन करण्याच्या दृष्टीने अहमदनगर-मनमाड रस्ता कामाच्या मंजुर निधीतुन डी.एस.पी. चौक आणि एम आय.डी.सी. असे दोन उड्डाणपुल तथा भुयारीमार्ग बांधणे, शेवगांव येथे बाह्यवळण रस्त्याचे काम करून तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या वाहतुकीचे नियोजन करणे, तसेच दुरावस्थेत आलेल्या अहमदनगर शहरातील डी.एस.पी. चौक येथील शासकीय निवासस्थाने ‘बांधा, वापरा, हस्तांतरण करा’ या तत्वावर विकसित करण्याबाबतचे एक सादरीकरण बैठकीत करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबतच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सदर विकास कामांना तत्वत: मंजूरी दिल्याची माहिती विखे पाटील यांनी सांगितली. या मागणीमुळे नगर जिल्ह्यातील रस्ते वाहतुकीचे योग्य नियोजन होऊन जनतेला वाहतुकीसाठी अतिशय चांगले आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध होणार आहेत, विखे पाटील यांनी सांगितले.