२०२४ ला पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ दे असे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी देवीला घातले साकडे.
पाथर्डी,प्रतिनिधी. (20.ऑक्टोबर.2023.) : सध्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र भक्तिमय वातावरण असून विविध देवी मातांच्या मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. याच अनुषंगाने खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार मोनिकाताई राजळे यांनी अनोखी संकल्पना राबवून अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावर मंदिराच्या कळसावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री भगवती मोहटादेवीचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार मोनिकाताई राजळे यांनी मनोभावे दर्शन घेतले. तसेच देवी मातेची मनोभावे पूजा करून आरती देखील केली व उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप केले.
यंदाच्या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मोहटादेवी मंदिर परिसरात काहीतरी नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचे मनात होते. आज त्या संकल्पनेची पूर्ती झाली आहे. याआधी देखील कधीही न राबविण्यात आलेले अनेकविध उपक्रम राबविण्यासाठी मी नेहमी प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे मोहटादेवीचे आमच्या मनात एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासमवेत मंदिराच्या कळसावर पुष्पवृष्टी करून देवीची आराधना करण्याचं काम केलं असल्याचं खासदार सुजय विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.