गारगोटी तस्करीच्या वादातून तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याचे प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता..
नगर, प्रतिनिधी. (22.ऑक्टोबर.2023.) : अहमदनगर येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश मा.श्री. सुधाकर व्ही. येरलागड्डा साहेब यांचे न्यायालयात खटला चालू होता. सदर आरोपींविरुद्ध पारनेर पो.स्टे. येथे गु.र.नं. १५७/२०१७, भा.द.वि. कलम ३०२, २०१, ३४ प्रमाण दाखल झाला होता.
सदर खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की, दि. २७/८/२०१७ रोजी रात्री १० वा. चे पुर्वी सावरगाव शिवारात गोडसेवाडी, ता. पारनेर येथील विनोद दत्तात्रय गोडसे यांच्या नवीन बंगल्यात राजन सुरेंद्र शेटे हे त्यांचे मित्र अशोक सिताराम खेवरे व कैलास मारुती कुसमूडे व सचिन प्रकाश क्षिरसागर यांचे सोबत असताना त्यांच्यात गारगोटीच्या पैशाचे व्यवहारावरुन भांडण झाले व भाऊ राजन यांचा राग येऊन अशोक खेवरे यांनी त्याचे जवळील गावटी कट्याने त्याच्या गालावर गोळी झाडून त्याचा खून करुन त्याचे जोडीदारांच्या मदतीने प्रेत गाडीमध्ये घेऊन त्याने आत्महत्या केली असा बहाणा दाखवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.फिर्याद सागर शेटे यांनी पारनेर पो.स्टे. येथे तशी फिर्याद दिली होती, त्यावरुन आरोपी यांना अटक करुन त्यांचे विरुद्ध जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले,त्यावेळचे शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनाही सदर प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला.सदर प्रकरणाची प्रधान जिल्हा न्यायाधिश यांचे समक्ष चौकशी होऊन आरोपी यांची निर्दोष मुक्तता केली.
आरोपीचे वतीने अॅड. महेश तवले, अॅड. संजय दुशिंग यांनी काम पाहिले व अॅड. निलेश देशमुख, अॅड. अक्षय दांगट, अॅड. संजय वालेकर, अॅड. निरंजन आढाव, अॅड. विशाल काळे, अॅड. बाळासाहेब कराड, अॅड. शुभम ठोकळ, अॅड.निखील ढोले यांनी सहकार्य केले.