जालिंदर बोरुडे यांना सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्कार’ जाहिर.
नगर,प्रतिनिधी. (20. डिसेंबर.2023.) : महाराष्ट्रातील सर्व सरपंचाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघाच्यावतीने ‘मान नेतृत्वाचा... सन्मान कर्तुत्वाचा’.. कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ समाजसेवक जालिंदर बोरुडे यांना राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या व माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे करुन समाजात एक आदर्श निर्माण केलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो.
रविवार दि.24 डिसेंबर 2023 रोजी माऊली सभागृह, सावेडी, अ.नगर येथे होत असलेल्या कार्यक्रमात आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील व यादवराव पावसे यांच्या प्रमुख उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे आदिंसह सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक जालिंदर बोरुडे हे गेल्या 30 वर्षांपासून नेत्र तपासणी व नेत्रदान चळवळीत मोठे काम केले आहे. दर महिन्यांच्या 10 तारखेला नागरदेवळे येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रियेच्या माध्यमातून लाखो रुग्णांना दृष्टी देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन करत समाजातील वंचित घटकांना आरोग्य सुविधा पुरवित आहेत. त्यांच्या या कार्याची अनेक संस्थांनी दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.सरपंच सेवा संघाच्यावतीने राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्कार’ जाहिर झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.