टि.पी.शिंदे दादांना श्रद्धांजली अर्पण करताना दादांची थोरली मुलगी आशा ताईने व्यक्त केलेल्या भावना.
वडील नावाचे छत्र जो पर्यंत डोक्यावर असते तोपर्यंत मुलांना जीवनात कोणत्याच झळा बसत नाहीत ...!!!
परंतु ज्या दिवशी या छत्राची सावली हरपते त्या दिवशी जीवनात या जगातील चटक्यांची जाणीव होते ...!!!
दादा तुमच्या पुण्य आत्म्यास शांती लाभो.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
नगर, प्रतिनिधी. (26. डिसेंबर.2023.) : शिंदे कुटुंबीयांचे आधारस्तंभ, आमचे वडील, दादा म्हणजेच टि. पी. शिंदे परवा दि. 24/12/2023 रोजी अनंतात विलीन झाले.आमचे दादा म्हणजे एक विचार होता.सर्वांना सामावून घेणारा तो एक विशाल प्रवाह होता.
1932 साली आमचे आजोबा शेतकरी कै. पाटीलबा आणि आजी लक्ष्मीबाई यांच्या पोटी जन्माला आलेल्या या लेकराने लहानपणा पासूनच शिक्षणाचा ध्यास घेतला होता. वडिलांचा विरोध, आर्थिक मदत शून्य अशा परिस्थितीत फडक्यात भाकरी बांधून, रोज 11कि मी चालत जावून, प्रसंगी गावोगावी गारीगार विकून,चौकात चॉकलेट गोळ्या विकून निरंतर शिक्षण चालू ठेवले. रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला. दादांचे मावस काका रा. ना. पवार यांनी दादांची शिक्षणाप्रती आसक्ती बघून त्यांच्या घरी आसरा दिला. घरातील छोटी मोठी कामे करत दादांचे शिक्षण चालू होते. सातवीचे शिक्षण पूर्ण होताच प्राथमिक शिक्षकाची नोकरी धरली. नोकरी करत करत पुढील शिक्षण, बरोबरच लहान बहीण मंदाचे शिक्षण असा जीवनक्रम चालू होता. तल्लख बुद्धी, कष्ट, प्रामाणिकपणा, निती, प्रेम ,आपुलकी हीच त्यांची संपत्ती होती. शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी, आणि Retired Deputy CEO असा त्यांचा खडतर प्रवास होता.
दादा एक अगाध विचार होता. जीवनाविषयी विशाल दृष्टिकोन असणारे ते एक तत्वचिंतक व्यक्तीमत्व होते. भेद-भाव, जात-पात, उच्च-नीच या पलीकडे माणसाला माणूस म्हणून सन्मान देणारा एक देवमाणूस अशी त्यांची ओळख होती.समाजातील विषमता संपली पाहिजे, शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे असा त्यांचा प्रयत्न होता.
पुरोगामी विचार, समतावादी दृष्टिकोन, सत्यवर्तन, अतिशय प्रामाणिक,साधी रहाणी, करारी , शिस्तप्रिय हाच त्यांचा स्थायीभाव होता. देवधर्म, कर्मकांड यांना वळसा घालून स्वतःच्या आईवडिलांनाच देव मानणारे आमचे दादा म्हणजे एक आदर्श आणि प्रभावी व्यक्तित्व होते.
दादांचा नावलौकिक, आवाका मोठा होता. अनेकांना कवेत घेणारा तो एक अथांग सागर होता. दादा एक शैक्षणिक चळवळ होती. स्री शिक्षणाविषयी विशेष प्रयत्न होते.दादा एक परीस स्पर्श होता. ज्यांच्या ज्यांच्या आयुष्याला त्यांचा स्पर्श झाला त्या सर्वांचे आयुष्य समृध्द होत असे.त्यांनी हजारो लोकांना ( अंदाजे चौदा - पंधरा हजार) नोकरीला लावले. शेकडो मुलामुलींची लग्न ठरवली, अनेकांच्या शिक्षणाला मदत केली, अडचणीत असणाऱ्यांना आर्थिक सहाय्य केले, अगणित आयुष्ये सावरली, दिशा दाखवली.
मुलांच्या लग्नानंतर सुनांना मुली मानून त्यांच्या मागे ठाम पणे उभे राहिले. पुढील शिक्षण घेण्यास उत्तेजन दिले.जन लोकांचे आदर्श, मार्गदर्शक, प्रेरणास्थान असणाऱ्या आमच्या दादांनी सुख दुःखात न डगमगता नैतिकता, सन्मार्ग, सत्याची कास कधीही सोडली नाही. ते एक आनंदी, समाधानी आणि समर्पित जीवन जगले.
परवा अचानक दादा आम्हाला सोडून गेले. दादांच्या अंत्यविधीला त्यांनी जोडलेला सगळा लोक परिवार उपस्थित होता. संध्या समयी वारा स्तब्ध होता, धरती शोकाकुल झाली होती, पक्षांचा किलबिलाट थांबला होता, आणि अश्रूपूर्ण नयनांनी मावळतीकडे झुकलेल्या सूर्यानेही त्यांना मानवंदना दिली.दादा अनंतात विलीन झाले असले तरी त्यांचा विचार अनेकांच्या आयुष्यात जिवंत आहे. आम्हा भावंडांच्यात ती विचारधारा सतत वाहत आहे.
"जीवनपट आज आपुला, पहातो वळून जरा
तुमच्यासम जगण्याचा प्रयत्न, हाच असे बोध खरा..."
आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आमच्या दुःखात सहभागी होऊन सांत्वन करण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न आमच्यासाठी सदैव स्मरणात राहील.
दुःखाकित.
डॉ.आशा आणि सतीश बर्गे.
मेघना आणि विकास शिंदे.
उमा आणि जीवन शिंदे.
श्रीमती कलावती तुकाराम शिंदे.
समस्त शिंदे परिवार ...!!!