जामखेड तालुक्यामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न..
जामखेड,प्रतिनिधी.(17.जानेवारी.2024.) : विखे पाटील परिवार कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता नेहमी समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. आत्तापर्यंत खूप उपक्रम या अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील परिवाराने राबवले आहेत असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. ते जामखेड येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच साखर वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
तसेच ते पुढे म्हणाले की, महिलांसाठी शनिशिंगणापूर शिर्डी तसेच पंढरपूर तुळजापूर अशा भक्तीपिठांची यात्रा आयोजित करून महिलांना दर्शन घडवून आणले. यासोबतच 22 जानेवारी रोजी अयोध्येत संपन्न होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकाने दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी करावी या हेतूने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण नगर दक्षिण मध्ये साखर वाटप देखील करत आहोत असे सांगून या उपक्रमाचा हेतू म्हणजे सदरील सोहळ्याच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यात पुन्हा दिवाळी साजरी केली जाईल असेही डॉ. सुजय विखेंनी स्पष्ट केले.
यासोबतच त्यांनी सांगितले की, जामखेड तालुक्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू न देता प्रत्येक गावामध्ये निधी पोहोचवण्याचे प्रामाणिक काम केले आहे. याचेच फलित म्हणजे विकास कामांचा ओघ हा वाढतच आहे. आज प्रत्येक गावामध्ये जात असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा निधी देऊन त्या गावातील विकास कामांना प्राधान्य दिले जात आहे आणि ही वाटचाल यापुढेही सुरूच राहील असेही त्यांनी संगितले.
विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून शाश्वत विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुरेपूर निधी हा जनसामान्यांना उपलब्ध होत असतो. त्यामुळे सदरील विकासकामे वेगाने मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. दरम्यान आज खासदार सुजय विखेंनी जवळा, खर्डा, शिवूर, मोहा, जामखेड शहरांमध्ये आज चार किलो साखर व चणाडाळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.