'भुगोलाचे' शिक्षक 'भुगोल' दिनाच्या दिवशीच झाले अनंतात विलीन...
निधनाची वार्ता समजताच सर्वत्र हळहळ..!!
संममनेर, प्रतिनिधी.(20. जानेवारी.2024.) - संगमनेर तालुक्यातील अंभोरे या गावातील मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ आणि आदर्शवादी व्यक्तिमत्त्व असलेले शिक्षक पाटीलबा तुकाराम खेमनर यांना रविवार ता. १४ जानेवारी रोजी पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राध्यापिका श्रीमती प्रियदर्शनी गवारे-लहरे यांनी वाहिली आदरांजली..!!
आदरणीय पी.टी. सर......
तुम्ही आयुष्यभर जो विषय आत्मीयतेने शिकवलात तोच विषय जगलातही आणि त्याच विषयाशी तुम्ही समरूपही झालात. भुगोल विषय शिकविणाऱ्या शिक्षकानं असं १४ जानेवारी 'ला भुगोल दिनाच्याच दिवशी सर्वांना चटका लावून अनंतात विलिन होणं म्हणजे याला म्हणावं तरी काय ? नियतीचा विलक्षण योगयोग...! सर तुम्ही नेहमी विद्यार्थी बरोबरच आम्हा शिक्षकांनाही बऱ्याच गोष्टी शिकविल्या. आणि शेवटी जातानाही आपल्या विषयाशी एकरूप कसं आसावं हे ही दाखवून गेलात. सर, तुम्ही फक्त शिक्षक नव्हे तर खऱ्या अर्थानं हाडाचे शिक्षक होता...! तुमचं अस आकस्मिक जाणं म्हणजे विदयालयातील एक ज्ञानरुपी वृक्ष नाहीसा होणं या समान आहे. तुमचं जाणं म्हणजे केवळ विद्यार्थीच नव्हे तर सर्वांनाच वाट दाखवणारा एक लख्ख प्रकाशमान दीपस्तंभ कायमचा नजरेआड होणं आहे. तुमची कामाबद्दलची निष्ठा आणि वक्तशीरपणा याच ज्वलंत उदाहरण म्हणजे तुमचं शाळेत रोज सकाळी एक तास अगोदरच १०.०० वाजताच हजर असणं तुमच्यातील ती विनयशीलता, संघभावना, खिलाडू वृत्ती, बोलण्यातील शालीनता, चेहऱ्यावरील प्रसन्नता, व्यक्तीमत्वातील निरागस साधेपणा, स्वभावात्तील दिलखुलास रसिकता, तुम्ही जपलेली आणि जोपासलेली विनम्रता, सभ्यता, हृदयातील सच्चेपणा आणि लहान-थोरांसाठीचा तुमच्या मनात असलेला तो आदरभाव माझ्यासारख्या नवोदित शिक्षकांना सदैव प्रेरणा देत राहील तुमच्यातील आणखी एक दुर्मिळ गुण म्हणजेच तुमची सदैव मातीशी घट्ट असलेली नाळ व कधीही तुम्हास स्पर्श न केलेला अहंभाव... सगळंच दुर्मिळ. तुमच्या विचारांचा, अनुभवांचा आणि आठवणींच ठेवा कधीही न संपणारा आहे. तुम्ही घालून दिलेल्या संयमित संतुलित, विनम्र वर्तणुकीचा आदर्श आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आणि अनुकरणीय आहे. तुमचे मार्गदर्शन लाभले ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट होय.
सर.... विद्यालयासाठी तुमचं योगदान अतुलनीय आणि अविस्मरणीय आहे! तुमच्या ऋणांतून उतराई होणं केवळ अशक्य आहे. म्हणूनच ही शब्दसुमने, भावसुमने कृतज्ञतापूर्वक अर्पण करते!!
मल्हारराव होळकर माध्य. व उच्च माध्य. विद्यालय अंभोरे. येथील प्राचार्य श्री .गायकवाड सर , सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवृंद सर्वांच्या वतीने आपल्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! भावपूर्ण आदरांजली !!
प्राध्यापिका श्रीमती प्रियदर्शनी गवारे-लहरे .मो.+91 77208 10381