शेतकरी कुटुंबातील कु.योगिता अंकुश नरवडेचा लोकसेवा आयोगाच्या भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेत देशात तेरावा क्रमांक.
नगर,प्रतिनिधी.(02.फेब्रुवारी.2024.) : नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथील रहिवासी योगिता अंकुश नरवडे ही 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) इंडियन स्टॅटिस्टिकल सर्विसेस (ISS) या परीक्षेत देशात तेराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन,भारतीय रिझर्व बँक आणि केंद्रीय लोकसेवा आयोग अशा चार परीक्षेत योगिता उत्तीर्ण झाली आहे.
योगिताचे प्राथमिक शिक्षण टाकळी खातगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून हनुमान विद्यालय टाकळी खातगाव येथे दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण झाले आहे . दहावीला असताना योगिता विद्यालयात प्रथम आली होती. तिने अहमदनगर महाविद्यालयात बी.एससी स्टॅटिस्टिकलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर तिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.एससी विशेष प्राविण्यासह पूर्ण केले. ती नेट,सेट व गेट परीक्षा ही उत्तीर्ण झाली आहे. तिने त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वन अधिकारी तसेच वैद्यकीय विभागाच्या परीक्षा ती उत्तीर्ण झाली. तिने या पदांवर समाधान न मानता केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास सुरूच ठेवला आणि देशात तेराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तसेच भारतीय रिझर्व बँकेची डी.एस.आय.एम या पदाच्या परीक्षेत तिने यश संपादन केले आहे. योगिता टाकळी खातगाव परिसरात लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणारी पहिली महिला आहे.तिच्या ह्या निवडीबद्दल समस्त नातेवाईक,मित्रमंडळी तसेच ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
योगिताचा समस्त ग्रामस्थ टाकळी खातगाव यांच्यातर्फे भव्य नागरी सत्कार करण्याचे आयोजन रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4:00. वाजता साई मंगल कार्यालय, टाकळी खातगाव,तालुका -जिल्हा अहमदनगर येथे होणार आहे.