श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठ,शिवाजीनगर,केडगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे.
नगर, प्रतिनिधी. (10. मार्च.2024.) : श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठ,शिवाजीनगर,केडगाव, अहमदनगर येथे श्री.शंकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली महाशिवरात्री निमित्त पहाटे श्रींच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. यावेळी मंदिर परिसराची विविध प्रकारच्या फुलांनी, बेल पानांनी, विविध फळांनी सजावट करण्यात आली होती.
महाशिवरात्रीचे औचित्य साधून भाविकांसाठी शिवशक्ती व महामृत्युंजय याग हवन पूजा करण्यात आली. या पूजेसाठी नगर शहरासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील भाविक सहभागी झाले होते. या पूजेत बसलेल्या भाविकांचा पेहराव हा पारंपारिकच होता.पूजेला बसलेल्या भाविकांच्या समोर गुरुदेव दत्त,भोलेनाथ,श्री.शंकर महाराज,साडेतीन शक्तीपीठ, नवनाथ महाराज, बारा जोतिर्लिंग, अष्टविनायक, महाकाल यांच्या मूर्ती - फोटो पूजेसाठी ठेवण्यात आल्या होत्या.आजपर्यंत सर्वच देव देवता समोर ठेऊन पूजा, होम हवन करताना पहिल्यांदाच भाविक पाहत होते. यावेळी भाविकांकडून पार्थिव शिवलिंग बनवून त्याची विधिवत पूजा करण्यात आली.शिवशक्ती व महामृत्युंजय याग हवन पूजा झाल्यानंतर दुपारी शंकर पार्वती विवाह सोहळा करण्यात आला.
आजपर्यंत भाविकांना महाशिवरात्र म्हणजे फक्त उपवास करणे घरा जवळील एखाद्या महादेवाच्या मंदिरात दर्शनाला जाणे एवढेच माहित होते, परंतु आज भाविकांना हे समजले कि महाशिवरात्रीला शंकर पार्वती यांचा विवाह सोहळा असतो. श्रीमंत सद्गुरु शंकर महाराज मठाचे मठाधिपती गुरुवर्य अशोक दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील भाविकांना एकत्र करून एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम भाविकांनी प्रथमच अनुभवला.जस आपण विवाह सोहळा करतो तशाच प्रकारे सर्व प्रथम शंकर-पार्वती यांना महिला भाविकांकडून हळद लावण्याचा कार्यक्रम करण्यात आला, त्यानंतर शंकर पार्वती यांची वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीमध्ये सर्व भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.यावेळी वेगवेगळ्या फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती. यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला भाविक डोक्यावर पार्थिव शिवलिंग घेतलेले दृश्य विलोभनीय दिसत होते. त्यानंतर मंगलअष्टक म्हणून शंकर-पार्वती यांचा विवाह थाटात लावण्यात आला.
यावेळी श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठातर्फे भाविकांसाठी उपवासाची मिसळ, ताकचे विशेष आयोजन करण्यात आले होते. याचा भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
संध्याकाळी दौंड येथील प्रसिद्ध गायक सनिभैय्या वाघेला यांच्या भजन संध्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
!! नाद भयंकर बोला जय शंकर.!!