श्री.गजानन महाराज प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा.
नगर, प्रतिनिधी. (04. मार्च.2024.) : सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, नवले नगर परिसरातील श्री.गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्त मूर्तीचा लघु रुद्राभिषेक पहाटे 6:00 वाजता करण्यात आला. सकाळी 9:00 वाजता श्रींची आरती करून पालखीची सुरुवात करण्यात आली. यावेळी परिसरातील महिलांनी आपापल्या दरवाजासमोर सडा व विविध रंगांच्या आकर्षक रांगोळ्या काढून परिसरातील नागरिकांच्या परिवारांकडून पालखीचे स्वागत करण्यात येत होते.यावेळी विविध फटाक्यांची आतिषबाजी होत होती.
दुपारी ठीक 12:00 वाजता पालखीचे मंदिरात प्रस्थान झाले. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले.यावेळी प्रसिद्ध नृत्यांगना वैष्णवी पाटील,उद्योजक अमोल गाडे,मा.नगरसेविका ज्योती गाडे,शोभा बोरकर, मा.नगरसेवक निखिल वारे,रामदास आंधळे, अभिजित खोसे, इंजि.केतन क्षीरसागर ,वैभव वाघ, अशोक गायकवाड, संपत नलावडे,राजू मंगलारप,नितीन शेलार,वर्चस्व ग्रुपचे सागर मुर्तडकर, अमित गटणे, करण भळगट,यांसह मंदिरातील कार्यकर्ते आणि परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा व विखे पाटील फाउंडेशनच्या संचालिका सौ.धनश्री सुजय विखे पाटील यांनी श्रींचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.यावेळी अमित गटणे व करण भळगट उपस्थित होते.
महाआरतीची सुरुवात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आली.आरती झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.श्री.गजानन महाराजांना आवडणाऱ्या पिठलं,अंबाड्याची भाजी,ज्वारीची भाकरी, भात,लापशी,ठेचा या वस्तूंचा महाप्रसादात समावेश होता. यावेळी मंदिर परिसराला विविधरंगी आकर्षक फुलांची सजावट, विविध रंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
नवले नगर रहिवासी सेवा संस्था गेल्या 30 वर्षांपासून श्री. गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचे उत्साहात नियोजन करून आनंदात कार्यक्रम पार पाडत असतात. दरवर्षीपेक्षा जास्त यावर्षी साधारण 5000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत ही गर्दी कायम होती.
संध्याकाळी 7:00 वाजता भक्तीरंग प्रस्तुत भजन संध्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी परिसरातील महिलांनी व नागरिकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.